पोलिसाच्या वेशातील श्री गणेशाची प्रतिकृती रस्त्यावर ठेवण्याचा ठाणे पोलिसांचा संतापजनक प्रकार !
विरोधानंतर प्रतिकृती हटवली; मात्र हिंदुद्रोही कृत्याचे अश्लाघ्य समर्थन !
- सरकारी कार्यालयांमध्ये हिंदूंच्या देवतांची छायाचित्रे लावलेली चालत नाहीत; पण त्याच सरकारी कार्यालयांनी हिंदूंच्या देवतांचे विडंबन केलेले कसे चालते ? हे चित्र पालटण्यासाठी आता हिंदूंनीच पुढाकार घ्यायला हवा ! – संपादक
- श्री गणेशाची प्रतिकृती आधुनिक रूपात दाखवून हिंदु धर्मियांचा अवमान करणार्या पोलिसांनी कधी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याचे धारिष्ट्य दाखवले असते का ? – संपादक
मुंबई, १ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती ठाणे जिल्ह्यातील जांभळीनाका येथील बाजारपेठेतील रस्त्यावर ठेवण्याचा संतापजनक प्रकार ठाणे शहर पोलिसांनी केला. पोलिसाच्या वेशात असलेल्या या श्री गणेशाच्या प्रतिकृतीच्या हातात प्रबोधनात्मक फलक ठेवण्यात आला होता. हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांनी यास विरोध दर्शवल्यानंतर पोलिसांनी ही प्रतिकृती हटवली; मात्र प्रतिकृती हटवतांना यामध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत हिंदुद्रोही कृत्याचे समर्थन केले.
१. पोलिसाच्या वेशातील श्री गणेशाच्या प्रतिकृतीद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची छायाचित्रे ठाणे शहर पोलिसांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून प्रसारित केली होती.
२. याविषयी प्रथम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ट्वीट’ करून ‘श्री गणेशाचा अशा प्रकारे वापर करण्याने गणेशक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत’, हे निदर्शनास आणून देत श्री गणेशाची विटंबना थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. समितीच्या आवाहनाला अनेक धर्मप्रेमींनीही पाठिंबा दर्शवून पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला.
३. त्यानंतर यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगून पोलिसांनी ही प्रतिकृती हटवत असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. यावर अनेक धर्मप्रेमींनी यातून श्री गणेशाचा अवमान होत असल्याचे पुन्हा पोलिसांच्या लक्षात आणून दिले; मात्र याविषयी क्षमा मागण्याऐवजी यामध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे ‘ट्वीट’ पोलिसांकडून पुन:पुन्हा करण्यात आले. पोलिसांच्या या भूमिकेचाही अनेक धर्मप्रेमींनी निषेध केला.
४. एका व्यक्तीने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये ‘सरकारी यंत्रणा असे धारिष्ट्य अन्य धर्मियांविषयी का दाखवत नाही ? याचे उत्तर सर्वांना ठाऊक आहे’, असे म्हटले आहे. (हिंदू सहिष्णू असल्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करूनही क्षमा न मागण्याची मग्रुरी पोलीस दाखवत आहेत. येथे अन्य धर्मीय असते, तर पोलिसांनी शेपूट घालत कधीच क्षमायाचना केली असती. हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचा कुणीही अवमान करू धजावणार नाही, अशी स्वतःची पत निर्माण करा ! यासाठी संघटित होऊन स्वत:मधील धर्माभिमान जागृत करा ! त्यामुळे असे प्रकारे आपोआप थांबतील ! – संपादक)