गोव्यात १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठ्याला प्रारंभ

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सेव्ह वॉटर टू गेट फ्री वॉटर’ (पाणी वाचवा आणि विनामूल्य पाणी मिळवा) या योजनेची नुकतीच घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत १ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला १६ सहस्र लिटर पाणीपुरवठा विनामूल्य केला जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील अंदाजे ६० टक्के कुटुंबांना १ सप्टेंबरपासून पाणीपुरवठा विनामूल्य मिळणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येकाने सहभाग घेतल्यास उर्वरित कुटुंबांनाही त्याचा लाभ होईल आणि विनामूल्य पाणीपुरवठा लाभधारकांची टक्केवारी वाढण्यास साहाय्य होईल.

३१ ऑगस्टला सायंकाळी गोव्यातील जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला १ सप्टेंबरपासून नळजोडणीच्या माध्यमातून १६ सहस्र लिटर पाणीपुरवठा विनामूल्य देण्यात येईल, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनी मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्या वचनाची आता पूर्तता होणार आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील लहान औद्योगिक आस्थापनांसाठी औद्योगिक दरानुसार शुल्क आकारणी न करता व्यायसायिक दराने देयक आकारले जाणार आहे. त्यामुळे लहान औद्योगिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळणार आहे. कित्येक वर्षांपासून थकलेल्या पाणीपुरवठा देयकांसाठी चालू असलेली ‘एकरकमी परतफेड योजना’ २ मासांनी वाढवण्यात आली आहे. पाणीपुरवठा विनामूल्य हवा असल्यास प्रत्येकाने पाणी वाया जाऊ न देता, त्याची बचत करणे आवश्यक आहे, तरच ही योजना यशस्वीरित्या कार्यवाहीत आणणे शक्य होईल.