आक्रमणाच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन
ठाणे येथे साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
ठाणे, १ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणामुळे अधिकारी वर्ग संतप्त झाला आहे. या आक्रमणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबर या दिवशी एम्एम्आर् रिजनमधील सर्व महानगरपालिका आणि नगर पालिकांमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी १ दिवस कामबंद अंदोलन केले.
ठाण्यातील लोकप्रतिनिधींनीही १ सप्टेंबर या दिवशी झालेल्या महासभेत या आंदोलनाला पाठिंबा देत पूर्णवेळ महासभा तहकूब केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानुसार हे कामबंद आंदोलन करण्यात आले.