रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. ऐश्वर्या रायकर (वय २० वर्षे) यांना कर्नाटक शास्त्रीय संगीताचा सराव करतांना आलेल्या अनुभूती !
शास्त्रीय संगीतामध्ये स्वरस्थाने पक्की होणे अत्यंत आवश्यक असते. ही स्वरस्थाने पक्की होण्यासाठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रथम विविध अलंकारांचा (अलंकार म्हणजे सप्त स्वर विविध पद्धतींनी गाणे) सराव करावा लागतो. त्याचप्रमाणे कर्नाटक भारतीय शास्त्रीय संगीतातही प्रारंभी विविध अलंकारांचा सराव करावा लागतो. हे अलंकार ७ ताल (धु्रवताल, मठ्यताल, रूपकताल, झंपेताल, त्रिपुटताल, अटताल आणि एकताल) आणि ५ जाती (चतुरश्र जाती, खंड जाती, मिश्र जाती, तीश्र जाती, संकीर्ण जाती) यांच्यावर आधारित आहेत. या अलंकारांच्या विविध प्रकारांचा सराव करतांना कु. ऐश्वर्या रायकर यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. कु. ऐश्वर्या यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीतातील ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
२६ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये ‘तारस्थायी’, ‘सरळेवरसे’, ‘जंठीवरसे’ हे संगीतातील प्रकार आणि ‘खंड जाती’ हा अलंकाराचा प्रकार, तसेच अभंग आणि भजने गातांना कु. ऐश्वर्या रायकर यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/505941.html
६. ‘धृव’नामक तालावर आधारित असणार्या ‘चतुरश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करतांना आलेल्या अनुभूती
६ अ. मंद, मध्यम आणि द्रुत गतीमध्ये सराव गातांना ‘शिव कैलासावर करत असलेल्या तांडवातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : २१.६.२०२१ या दिवशी या अलंकाराच्या प्रकाराचा मी अनुक्रमे मंद, मध्यम आणि द्रुत गतीमध्ये सराव केला. या तीनही गतींमध्ये सराव करतांना मला ‘शिव कैलासावर तांडव करत आहे आणि त्या तांडवातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.
६ आ. भावपूर्ण गायल्याने सूक्ष्मातून वैकुंठाची सातही द्वारे उघडून श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती
६ आ १. वैकुंठात जाऊन श्रीमन्नारायणाचे दर्शन घेण्यासाठी साधिकेने श्रीविष्णूच्या द्वारपालांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे भावपूर्ण गाण्याचा प्रयत्न करणे : २७.७.२०२१ या दिवशीही मी या प्रकाराचा सराव केला. त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीविष्णूचे द्वारपाल (जय आणि विजय) मला सांगत आहेत, ‘जर तू वैकुंठाच्या द्वाराबाहेर बसून भावपूर्ण गाणे गायलीस, तर आम्ही तुला श्रीमन्नारायणाचे दर्शन घ्यायला आत सोडू.’ हे ऐकून श्रीमन्नारायणाचे दर्शन घेण्याची माझी इच्छा तीव्र झाली. त्या वेळी माझी भावजागृती होत होती. मी हा प्रकार मंद गतीमध्ये ५ – ६ वेळा गायला; पण ‘वैकुंठाचे दार उघडले नाही’, असे मला जाणवले. ‘तुझी आर्तता आणखी वाढव’, असे द्वारपाल मला सूक्ष्मातून सांगत होते.
६ आ २. मध्यम गतीने ३ – ४ वेळा गायल्यावर वैकुंठाचे पहिले द्वार उघडणे, द्रुत गतीने गातांना भावजागृती होणे आणि एकाच वेळी वैकुंठाचे दुसरे अन् तिसरे द्वार उघडलेले दिसणे : नंतर मी हा प्रकार मध्यम गतीमध्ये ३ – ४ वेळा गायला. चौथ्या वेळी जेव्हा मी हा प्रकार गायला, तेव्हा मला वैकुंठाचे पहिले द्वार उघडलेले दिसले. त्या वेळी माझी विष्णूच्या दर्शनाची ओढ आणखी वाढली. नंतर हाच प्रकार द्रुत गतीने गातांना माझी भावजागृती होत असल्याने मला गायला जमत नव्हते. तेव्हा ‘एकाच वेळी वैकुंठाचे दुसरे आणि तिसरे द्वार उघडले’, असे मला सूक्ष्मातून दिसले. हे दृश्य पाहून मला कृतज्ञता वाटली.
६ आ ३. ‘बृंदावनी’ रागातील बंदीश गातांना वैकुंठाची सातही द्वारे उघडणे आणि द्वारपालांनी साधिकेला आत जाण्याची अनुमती देणे : अलंकाराच्या या प्रकारानंतर मी ‘बृंदावनी’ रागातील ‘गोविंद हरि गोविंद’ ही बंदीश गायला आरंभ केला. त्यानंतर ‘वैकुंठाची सगळी, म्हणजे सातही द्वारे उघडली आणि द्वारपालांनी मला आत जायला सांगितले’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
६ आ ४. त्या वेळी माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप चालू होता.
६ आ ५. डोळे उघडल्यावर सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश दिसणे : मी हे सगळे दृश्य डोळे बंद करून अनुभवत होते. जेव्हा मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश दिसला. त्यामुळे मला डोळे उघडता येत नव्हते.
६ आ ६. वैकुंठाच्या आत गेल्यावर साधिकेला श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि त्यांनी तिला आशीर्वाद देणे : नंतर मला पुढील दृश्य दिसले, ‘मी वैकुंठाच्या आत गेले आणि श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांना स्पर्श केला अन् त्यांच्या चरणी पुष्प समर्पित केले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिले.’
७. ‘मठ्य’नामक तालावर आधारित असणार्या ‘चतुरश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करतांना आलेली अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा ध्यानावस्थेत असून त्यांच्याकडून शक्ती मिळत आहे’, असे जाणवणे : मी ‘मठ्य’नामक तालावर आधारित असणार्या ‘चतुरश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करत होते. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा ध्यानावस्थेत असून त्यांच्याकडून मला शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले. मी या पूर्वी प.पू. देवबाबा यांना कधी पाहिले नाही, तरीही मला त्यांचे दर्शन झाले.
८. ‘झंपे’नामक तालावर आधारित असणार्या ‘मिश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करतांना आलेली अनुभूती
श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होऊन भावजागृती होणे : ‘झंपे’नामक तालावर आधारित असणार्या ‘मिश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करतांना मला उभ्या असलेल्या श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. त्यांचे मनोहर रूप पाहून माझी भावजागृती होऊन मला माझ्या शरिरात हलकेपणा जाणवला.
९. ‘रूपक’नामक तालावर आधारित असणार्या ‘चतुरश्र जाती’ या अलंकाराच्या प्रकाराचा सराव करतांना मला शिव आणि पार्वतीमाता यांचे दर्शन झाले अन् माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला.
१०. ‘बिलहरी’ या रागातील ‘जतीस्वर’ (टीप १) हा संगीताचा प्रकार गातांना आलेली अनुभूती
‘बिलहरी’ या रागातील ‘जतीस्वर’ या संगीताच्या प्रकारातील स्वररचना गातांना मला श्रीकृष्णाच्या बाललीलांचे, उदा. कालिया नागाचा वध करणे, पूतना राक्षसिणीचा वध करणे, खोड्या करणे इत्यादींचे दर्शन झाले. त्या वेळी मी बंदिशीचे स्वर गात होते. या बंदिशीतील शब्दरचना तेलुगु भाषेत होती. मी गायलेल्या स्वररचनेच्या (‘नोटेशन’च्या) तेलुगु भाषेतील शब्दरचनेचा अर्थ पाहिल्यावर या बंदिशीत श्रीकृष्णाचेच वर्णन असल्याचे माझ्या लक्षात आले. (‘साधिकेची मातृभाषा कन्नड आहे.’ – संकलक) ‘देवाच्या कृपेनेच मी ही अनुभूती घेऊ शकले’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.
११. विविध रागांतील बंदिशी (कीर्तने) (टीप २) गातांना आलेल्या अनुभूती
११ अ. ‘आरभी’ या रागातील सरस्वतीमातेच्या बंदिशीचा (कीर्तनाचा) सराव करतांना आलेल्या अनुभूती
१. या बंदिशीचा (कीर्तनाचा) सराव करतांना मला ‘वातावरण शांत झाले असून वातावरणामध्ये पांढर्या प्रकाशाचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.
२. मला ‘सरस्वतीमाता पांढर्या रंगाची साडी नेसून वीणा वाजवत आहे’, असे दृश्य दिसले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती झाली.
११ आ. ‘बिलहरी’ या रागातील श्री चामुंडेश्वरीदेवीची बंदीश गातांना आलेल्या अनुभूती
१. १९.६.२०२१ या दिवशी मी ‘बिलहरी’ या रागातील श्री चामुंडेश्वरीदेवीची बंदीश गायले. तेव्हा या बंदिशीने मला शक्ती मिळत असल्याचे जाणवले. त्या वेळी मला देवीचे मारक तत्त्व जाणवले.
२. ३.८.२०२१ या दिवशी हीच बंदीश गातांना मला श्री चामुंडेश्वरीदेवीची प्रीती आणि वात्सल्य अनुभवता आले. त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले आणि ‘त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवून माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला,’ असे मला जाणवले.
११ इ. ‘मध्यमावती’ या रागातील बंदीश गातांना तिचा अर्थ ठाऊक नसूनही श्री कामाक्षीमातेचे दर्शन होणे आणि ‘बंदिशीत कामाक्षीदेवीचे वर्णन आहे’, हे नंतर लक्षात येणे : ‘मध्यमावती’ या रागातील बंदीश गातांना मला श्री कामाक्षीमातेचे दर्शन झाले आणि ‘मी तिच्या मंदिरात तिच्या चरणांजवळ बसून गात आहे’, असे मला जाणवले. माझी मातृभाषा कन्नड आहे. ‘ही बंदीश तेलुगु भाषेत असल्याने ती कामाक्षीदेवीशी संबंधित आहे’, हे मला ठाऊक नव्हते; परंतु मी जेव्हा या बंदिशीचा अर्थ पाहिला, तेव्हा ही बंदीश गातांना मला दिसलेली देवी आणि या बंदिशीतील कामाक्षीदेवीचे वर्णन, दोन्हीही समान असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी माझ्याकडून देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
(समाप्त)
– कु. ऐश्वर्या रायकर (वय २० वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.७.२०२१)
टीप १ – जतीस्वर : बंदिशीचे शब्द न म्हणता केवळ त्या बंदिशीची स्वररचना (नोटेशन) म्हणणे
टीप २ – बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच कर्नाटक शास्त्रीय संगीतात ‘कीर्तन’ असे म्हणतात. |
|