रुग्णालयाला आग लागल्यास संचालक उत्तरदायी ! – राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण ! – संपादक
नागपूर – कोरोनाच्या काळात राज्यातील काही रुग्णालयांत आगीच्या घटनांमुळे काही जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यात रुग्णालय प्रशासनाच्याही बर्याच चुका समोर आल्या होत्या. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यशासनाच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने अध्यादेश काढत ‘रुग्णालयात आगीची घटना घडल्यास त्याला संचालक उत्तरदायी रहातील’, असे स्पष्ट केले आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतीदक्षता विभागात ९ जानेवारी २०२१ या दिवशी भीषण आग लागली होती. त्यात १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात आग लागूनही काही रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या आगी लागण्याचे कारण ‘शॉर्ट सर्किट’ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णालयातील वीजपुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय आणि खासगी रुग्णालय येथील संचालकांना दिले आहेत.
कोविड काळात रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच, तसेच ‘इन्व्हर्टर’च्या माध्यमातून अंतर्गत वीजपुरवठा उपलब्ध करणे, शस्त्रकर्मगृह, अतीदक्षता विभाग येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत् उपकरणांची निगा अन् देखभाल योग्य रितीने करण्याविषयीचे दिशानिर्देशही यात नमूद केले आहेत. रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसमवेतच वीजपुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडित वीज पुरवठा राखण्याचे सामूहिक दायित्व रुग्णालय प्रशासन आणि पुरवठादार आस्थापन यांचे रहाणार आहे.