सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांसह नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! – शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक, सागर सुरक्षा विभाग
सिंधुदुर्ग – देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतीही अनोळखी व्यक्ती, अनोळखी नौका (बोट) दिसल्यास त्याची माहिती नागरिकांनी तातडीने १०९३ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर कळवावी, असे आवाहन सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी केले आहे. सागरी सुरक्षेविषयी ३१ ऑगस्टला ‘ऑनलाईन’ बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सीमाशुल्क विभाग (कस्टम), तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) यांसह जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कोळी पुढे म्हणाले, ‘‘ग्रामपातळीवरील सागर सुरक्षादलांच्या नियमित बैठका घेऊन त्यांच्या संपर्कात रहावे. १ सप्टेंबरपासून पोलिसांची नियमित गस्त चालू होणार आहे; पण स्थानिक नागरिकांनी अधिक सतर्क असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी स्थानिक सागरी सुरक्षादलांचे प्रमुख आणि पोलीस पाटील यांच्या संपर्कात रहावे.’’
या वेळी आतंकवादविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी बनकर म्हणाले, ‘‘समुद्रकिनार्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी मार्गाच्या ठिकाणी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. निर्मनुष्य बेटे, अनोळखी नौका आणि व्यक्ती यांची तपासणी करून संशय आल्यास त्यांना कह्यात घ्यावे. नवीन रहायला आलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी. संशयित व्यक्ती आणि वस्तू आढळल्यास त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला द्यावी.’’