देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी चव्हाण यांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेविषयी आलेल्या अनुभूती
१. वर्ष २०१८ मध्ये रक्तदाब वाढल्याने झोपल्यावरही मोठी चक्कर येणे, पत्नीला हाक मारणे, त्या वेळी ‘ती हाक पत्नीला ऐकू गेली नाही, तरी ती परात्पर गुरु डॉक्टरांना ऐकू गेली’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसणे
‘वर्ष २०१८ मध्ये मी आणि माझी पत्नी वाई (जिल्हा सातारा) येथे आमच्या घरी गेलो होतो. तिथे मला चक्कर येत होती. त्यामुळे मला नीट चालताही येत नव्हते. माझा तोल जायचा. मी झोपलो, तरी मला चक्कर येत होती. मला रुग्णालयात नेऊन रक्तदाब तपासला, तर तो ‘१८०/१६० mm hg’ (सर्वसाधारण रक्तदाब १२०/८० mm hg असतो.) असायचा. तो न्यून होत नव्हता. त्या रात्री मी झोपलो असतांना मला मोठी चक्कर आली. तेव्हा ‘कुणीतरी दाबून धरले आहे’, असे मला जाणवल्याने मी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो; पण मला ओरडता येत नव्हते. माझा जीव गुदमरला होता. मला पत्नीलाही हाक मारता येत नव्हती. ‘आता मी मरणार’, अशी माझी स्थिती झाली होती. माझे संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते. मला उठताही येत नव्हते. त्या वेळी, म्हणजे शेवटच्या क्षणी मी मोठ्याने हाक मारली; पण ती हाक शेजारी झोपलेल्या पत्नीला ऐकू गेली नाही. तेव्हा मला सूक्ष्मातून दृश्य दिसले, ‘ती हाक परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून ऐकू गेली आणि ते त्यांच्या खोलीत पलंगावर उठून बसले. त्यांनी माझ्याकडे दुरूनच पाहिले.’ मला त्यांचे सूक्ष्मातून दर्शन होताच मला बरे वाटले. अशा प्रकारे देवानेच मला मरणातून वाचवले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून घळाघळा भावाश्रू आले. नंतर ‘मला कधी झोप लागली’, हे कळलेच नाही.
२. पुण्यातील आधुनिक वैद्यांनी रक्तदाब तपासून ‘आता तुम्हाला देवच वाचवू शकतो’, असे सांगितल्यावर भीती वाटणे आणि एक आठवडाने वाई येथील आधुनिक वैद्यांनी तपासणी करून ‘सर्व ‘रिपोर्ट’ सामान्य आहेत’, असे सांगणे
नंतर आम्ही पुण्यातील रुग्णालयात गेलो. तिथे आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) माझा रक्तदाब तपासला, तर तो ‘२०० mm hg’ होता. त्या वेळी त्यांनी ‘तुम्ही या आजारातून वाचण्याची शाश्वती नाही. तुम्ही देवाचे नाम घ्या. तुम्हाला देवच वाचवू शकतो’, असे सांगितल्याने मी घाबरलो. त्या आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार मी एक आठवड्यात २ सहस्र रुपये किमतीच्या गोळ्या खाल्ल्या. तिथे एक कृष्णाचे मंदिर होते. मी त्या ठिकाणी जाऊन नामजप करत होतो. नंतर मी पुन्हा वाई येथे घरी आलो. मला काय करावे, ते काही सुचत नव्हते. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार मी ‘एम्.आर्.आय.’ आणि रक्त यांविषयी तपासणी केली. तेव्हा माझे सर्व ‘रिपोर्ट’ (अहवाल) सामान्य आले. पुन्हा तपासणी केल्यावर मला आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्हाला काहीही झाले नाही, सर्व ठीक आहे.’’
३. गुरुमाऊलीच्या कृपेने जिवंत असल्याचे लक्षात येऊन तिच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होणे
नंतर मला रामनाथी आश्रमात जाण्याविषयीचा निरोप साधकांकडून मिळाला. त्यानुसार आम्ही रामनाथीला गेलो. तेथे मी आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे यांना माझे सर्व ‘रिपोर्ट’ दाखवले. त्यांनी माझा रक्तदाब तपासला, तर तो सामान्य होता. त्यांनी मला सांगितले, ‘‘पूर्वीच्या आधुनिक वैद्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांपैकी केवळ एकच गोळी नियमित घ्या.’’ अशा प्रकारे मी जिवंत आहे, ही गुरुमाऊलीची कृपा आहे. यासाठी माझ्याकडून तिच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती होते. नंतर मी देवद आश्रमात सेवेसाठी आलो.
४. छत्र्या दुरुस्तीची सेवा करता येत नसूनही ‘देव सर्व करून घेईल’, असा भाव ठेवून ती सेवा स्वीकारणे आणि श्रीकृष्णाला विचारून छत्र्या दुरुस्त करता आल्यावर त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
जून २०१८ मध्ये देवद आश्रमात सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) यांनी ‘तुम्हाला छत्री दुरुस्त करायला येते का ?’, असे विचारले. मला प्रत्यक्षात छत्री दुरुस्त करता येत नाही, तरी ‘देव सर्व करून घेईल’, असा भाव ठेवून मी लगेच ‘हो’ म्हणालो. नंतर मी देवाला प्रार्थना करून ती सेवा चालू केली. आरंभी ‘छत्री कशी दुरुस्त करायची ?’, हे मला कळत नव्हते. त्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करून सेवेविषयी प्रश्न विचारल्यावर लगेच उत्तर मिळून माझ्याकडून त्याप्रमाणे कृती केली जायची. अशा प्रकारे देवच माझ्याकडून छत्र्या दुरुस्तीची सेवा करवून घेत होता. यासाठी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.
५. पू. दाभोलकरकाकांनी ‘आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला ‘धर्मरथ’ म्हणतो’, असे सांगितल्यावर भावजागृती होणे आणि ‘त्या गाडीच्या ठिकाणी श्रीकृष्ण अन् अर्जुन यांच्या रथाचे दर्शन होणे
नोव्हेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमात मला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या चैतन्यमय गाडीची पूजा करण्याची सेवा मिळाली. ती सेवा करतांना माझ्या मनात ‘देवच सत्सेवा करवून घेतो’, असा भाव असतो. एकदा सकाळी मी पूजेची सेवा करतांना तिथे सनातनचे संत पू. दाभोलकरकाका आले आणि बोटाने (प.पू. बाबांच्या गाडीकडे) निर्देश करून मला म्हणाले, ‘‘तुम्ही याला काय म्हणता ?’’ मी म्हणालो, ‘‘प.पू. बाबांची गाडी म्हणतो.’’ त्यावर पू. दाभोलकरकाका म्हणाले, ‘‘आम्ही याला ‘धर्मरथ’ म्हणतो.’’ ते शब्द ऐकताच माझी भावजागृती झाली आणि मला त्या गाडीच्या ठिकाणी श्रीकृष्ण अन् अर्जुन यांचा रथ’ दिसू लागला. नंतर ‘माझ्याकडून पूजेची सेवा कधी पूर्ण झाली’, हे मला कळलेच नाही.
६. प्रतिदिन पूजा करतांना भावजागृती होऊन ‘प.पू. बाबा श्रीकृष्णाच्या रूपात रथ चालवत असून परात्पर गुरु डॉक्टर अर्जुनाच्या रूपात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सज्ज आहेत’, असे वाटणे
त्यानंतर देव माझ्याकडून प्रतिदिन ‘हा श्रीकृष्णाचा रथ आहे’, असा भाव ठेवून प.पू. बाबांच्या गाडीची पूजा करून घेत होता. सेवा करतांना माझी भावजागृती होत होती. तेव्हा त्या गाडीकडे पाहून मला वाटत होते, ‘प.पू. बाबा श्रीकृष्णाच्या रूपात रथ चालवत असून रथात परात्पर गुरु डॉक्टर अर्जुनाच्या रूपात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सज्ज आहेत.’
७. पू. अश्विनीताईंनी ‘बॅगा दुरुस्त करायच्या आहेत’, असे सांगितल्यावर ती सेवा स्वीकारणे आणि त्या वेळी कुणी स्थुलातून न शिकवताही देवच सर्व शिकवत असल्याचे लक्षात येणे
जानेवारी २०२० मध्ये पू. अश्विनीताईंनी मला सांगितले, ‘‘काका, ‘बॅगा’ दुरुस्त करायच्या आहेत.’’ मी लगेच ‘हो’ म्हणून तीही सेवा चालू केली. माझ्याकडून ‘बॅगा’ व्यवस्थित दुरुस्त होत होत्या. तेव्हा ‘बॅगां’ना ‘चेन’ कशी बसवायची ?’, हे मला देवानेच शिकवले. त्या वेळी ‘कुणी स्थुलातून न शिकवताही हे सर्व मला कसे येते ?’, याचे मलाच आश्चर्य वाटायचे; परंतु सर्वकाही देवच करवून घेत होता. नंतर पू. अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘काका, हे कुठे शिकलात?’’ मी म्हणालो, ‘‘ताई, हे सर्व तुम्हीच करून घेता, मी काहीच करत नाही.’’
– श्री. शिवाजी लक्ष्मण चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०२०)
|