भविष्यात केवळ शाडू मातीच्याच श्री गणेशमूर्ती बनवण्याची इच्छा ! – माधवराव गाडगीळ, श्री गणेशमूर्तीकार
शाडूमातीच्या गणेशमुर्तींच्या आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ जाणून त्या मूर्तींचाच आग्रह धरा ! – संपादक
मिरज, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – आमच्या घराण्यात गेली ७० वर्षे श्री गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा असून सध्या आमची ४ थी पिढी हा वारसा पुढे चालवत आहे. आमच्याकडे असलेल्या ८५० मूर्तींपैकी ६०० मूर्ती या शाडूच्या असून यातील १५ मूर्ती या सनातननिर्मित सात्त्विक श्री गणेशाच्या चित्रानुसार सिद्ध केल्या आहेत. भविष्यात केवळ शाडूच्याच श्रीगणेशमूर्ती बनवण्याची इच्छा आहे, असे मत येथील ज्येष्ठ समर्थभक्त आणि मूर्तीकार श्री. माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
श्री. माधवराव गाडगीळ पुढे म्हणाले,
१. सनातननिर्मित सात्त्विक श्री गणेशाच्या चित्रानुसार मूर्ती सिद्ध करतांना आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला.
२. शाडूच्या मूर्ती बनवण्यास आणि रंगवण्यास प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा अधिक कष्टप्रद असले, तरी या मूर्ती बनवतांना त्यात अधिक चैतन्य जाणवते आणि त्या भाविकांना देतांना आनंद जाणवतो.
३. श्री गणेशमूर्ती सिद्ध करतांना आम्ही सात्त्विक आकार घेऊन, तसेच धर्मशास्त्रातील सर्व बंधने पाळून ती सिद्ध करतो. याशिवाय सज्जनगडावरील उपासना, प्रतिदिन अथर्वशीर्ष, श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र, श्रीसूक्त, पुरुषसूक्त अशी नियमित उपासना करूनच कोणत्याही कार्याचा मी आरंभ करतो.