चाळीसगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस !
६०० जनावरे वाहून गेली, तर १० लोकांच्या मृत्यूची शक्यता !
जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट या दिवशी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणाखालील नदी, उपनद्या आणि नाले यांना पूर आला. ४ गावांना पुराचा वेढा पडला असून त्यात दोघे अडकले आहेत. ‘एस्.डी.आर्.एफ्.’चे पथक बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे. कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे. या तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ६०० जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जनावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. १० लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.