नागपूर येथील गुन्हेगारीचा अड्डा असलेल्या ‘झिरो डिग्री बार’चे बांधकाम अवैध !
‘नागपूर सुधार प्रन्यास’कडून बांधकाम पाडण्यास टाळाटाळ !
‘झिरो डिग्री बार’चे बांधकाम अनधिकृत असतांनाही त्यावर ‘नागपूर सुधार प्रन्यास’कडून कारवाई होत नाही म्हणजे यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, पोलीस आणि अधिवक्ते यांनी संघटित होऊन न्यायालयाद्वारे हा बार पाडण्याचा आदेश मिळवून तशी कारवाई केली पाहिजे. – संपादक
नागपूर – शहरातील अनेक वस्त्या गुन्हेगारीसाठी ओळखल्या जातात; पण काही व्यावसायिक प्रतिष्ठानेही गुन्हेगारीचे अड्डे झाले असून यात पहिल्या क्रमांकावर ‘झिरो डिग्री’ बार आहे. या बारचे बांधकाम अवैध असून ‘नागपूर सुधार प्रन्यास’कडून बारला केवळ अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावून पुढे काहीच केले जात नाही, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
‘एम्.आय.डी.सी.’ पोलीस ठाण्यांतर्गत ‘झिरो डिग्री बार’ आहे. या बारचे मालक म्हणजे अवैध सावकारीसाठी ओळखला जाणारा कुख्यात गुंड तपन जयस्वाल आणि त्याची पत्नी हे आहेत. तपन जयस्वाल आणि त्याचा गुंड साथीदार गोलू मलीये यांच्यासह इतरांविरुद्ध काही मासांपूर्वी अवैध सावकारी अन् खंडणी वसुली यांचे ३ गुन्हे नोंद झाले होते. पोलिसांनी त्याची आर्थिक रसद तोडण्यासाठी ‘झिरो डिग्री बार’ची माहिती काढली असता बारची भूमी दुसर्याच्या मालकीची, तसेच इमारत बांधकाम पत्नीच्या नावाने असून सर्व बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आले होते. त्यानंतरही अनेक वर्षांपासून हा बार चालू आहे.
५ मासांपूर्वी ‘नागपूर सुधार प्रन्यास’ला बारचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची विनंती पोलिसांनी केली होती. ‘नासुप्र’ने बार आणि इमारत बांधकाम मालकाला नोटीस बजावून ‘बांधकाम का पाडण्यात येऊ नये ?’ अशी विचारणा केली. वर्ष २०१८ मध्येही ‘नासुप्र’ने बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावली होती; पण पुढे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ ‘नासुप्र’ची भूमिका केवळ नोटीस बजावण्यापुरतीच दिसत आहे. गोरगरिबांच्या बांधकामांवर तात्काळ हातोडा चालवणारी ‘नासुप्र’ श्रीमंत आणि गुंड प्रवृत्ती लोकांच्या बांधकामांची पाठराखण तर करत नाही ना ?, अशी चर्चा चालू आहे.