धर्माचरणाची आवड आणि राष्ट्राभिमान असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. देवांश सिद्धेश प्रभु (वय ७ वर्षे) !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. वय – १ ते २ वर्षे
१ अ. व्यवस्थितपणा
१. ‘देवांशने कोणतीही वस्तू घेतली की, तो ती वस्तू परत त्याच जागी ठेवतो. एकदा आमच्या तो घरी आला असतांना त्याने खेळायला छोटे टेबल घेतले होते. तो त्याच्या घरी जायला निघाल्यावर त्याने ते टेबल जागेवर ठेवले.’ – श्री. जयवंत साटम (देवांशचे आजोबा)
२. ‘तो २ वर्षांचा असतांना कुटुंबियांपैकी कुणीही एखादी वस्तू अव्यवस्थित ठेवली असेल, तर तो त्यांना त्याची जाणीव करून देऊन वस्तू नीट ठेवायला सांगायचा. एकदा दूरभाष संच वापरून झाल्यावर मी त्यावरील कापड व्यवस्थित ठेवले नाही. त्याने ते पाहिले आणि लगेच ‘बाबा, नीट ठेवा’, असे सांगून त्याने ते कापड नीट ठेवले.
१ आ. उत्तम स्मरणशक्ती : देवांशची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली आहे. घरी एकदा आलेल्या साधकांची नावे तो पुढील वेळी बरोबर सांगतो आणि त्याच नावाने हाक मारतो.’
– श्री. सिद्धेश प्रभु (देवांशचे वडील)
१ इ. सूर्यदेवतेप्रती भाव : ‘आम्ही त्याला एका मैदानात फिरायला घेऊन जायचो. मैदानाच्या मोठ्या प्रवेशद्वारावर सूर्यदेवतेची दोन मोठी चित्रे आहेत. एकदा आम्ही त्याला ‘हा सूर्यबाप्पा आहे’, असे सांगितले. त्यानंतर तो नेहमी मैदानात गेल्यावर चित्रांकडे पाहून ‘सूर्यबाप्पा, तुला नमस्कार’, असे म्हणून नमस्कार करायचा.’
– श्री. हरि प्रभु आणि सौ. नंदिनी प्रभु (देवांशचे आजोबा आणि आजी)
२. वय – २ ते ३ वर्षे
२ अ. ‘खेळतांना मुले कधी चुकीच्या पद्धतीने बोलली, तर देवांश त्यांना तसे न बोलण्याविषयी समजावून सांगायचा.
२ आ. राष्ट्राभिमान
२ आ १. ‘मेड इन चायना’ खेळणी घ्यायची नाहीत’, असे सांगितल्यावर त्याचे तंतोतंत पालन करणारा आणि अशा खेळण्याने न खेळणारा बाल देवांश ! : देवांशला शाळेत घेऊन जातांना रस्त्यात एक खेळण्याचे दुकान लागायचे. त्या दुकानातील ९९ टक्के खेळणी चीनमध्ये बनवलेली (‘मेड इन चायना’) असायची. त्या दुकानाजवळ आल्यावर देवांश ‘खेळणी पाहिजेत’; म्हणून हट्ट करून रडायचा. तेव्हा मी त्याला सांगितले होते, ‘‘चीन हा भारताचा शत्रू आहे’, त्यामुळे अशी खेळणी घ्यायची नाहीत.’’ देवांशच्या हे चांगले लक्षात राहिले होते. एकदा त्याचे आजोबा त्याला घेऊन बाहेर गेले होते. तेव्हा ते त्या दुकानातून खेळणी घ्यायला गेले. त्या वेळी देवांशने ‘मी जे त्याला सांगितले होते’, ते लक्षात ठेवून आजोबांना सांगितले. नंतर तिथून खेळणी न घेताच दोघे परतले. एकदा त्याच्या मावसभावाने तेथून खेळणे आणल्यावर देवांशने त्यालाही सांगितले आणि ‘आपण या खेळण्याने खेळायला नको’, असे सांगून ते खेळणे बाजूला ठेवून दिले.
२ आ २. ‘राष्ट्रध्वजाने खेळू नये’, असे सांगितल्यावर त्यासाठी कधीही हट्ट न करणे आणि ‘इतरांचेही प्रबोधन करावे’, असे देवांशने सांगणे : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी बाजारात राष्ट्रध्वज विकायला येतात. इतर मुलांप्रमाणे देवांशसुद्धा ‘राष्ट्रध्वज पाहिजे’, असे म्हणून रडायचा. त्या वेळी ‘राष्ट्रध्वज’ ही खेळण्याची वस्तू नाही. तो सतत आकाशातच उंच फडकायला पाहिजे’, असे सांगितल्यावर त्याने कधीही हट्ट केला नाही. काही मुलांच्या हातात राष्ट्रध्वज पाहिल्यावर, तसेच काही जणांनी चारचाकी किवा दुचाकी गाडीला लावलेला राष्ट्रध्वज बघितल्यावर ‘यांना कळत कसे नाही ? तुम्ही त्यांनाही सांगा’, असे तो मला सांगायचा.’ – श्री. सिद्धेश प्रभु
२ इ. भजनांची आवड : ‘इतर मुले या वयात भ्रमणभाषवर खेळ खेळतात; पण देवांश मात्र भजन ऐकायचा.
३. वय – ३ ते ६ वर्षे
३ अ. धर्माचरणाची आवड
३ अ १. टिळा लावणे : तो कुठेही बाहेर जातांना टिळा लावून आणि कापूर अन् अत्तर यांसारखे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच बाहेर जातो.
३ अ २. पाश्चात्त्य वेशभूषा न आवडणे : देवांशचे निरीक्षण चांगले आहे. शाळेतील काही मुलांची आई शाळेत ‘जीन्सची पँट आणि टी-शर्ट’ घालून यायच्या. ते पाहून देवांश मला सांगायचा, ‘‘त्या पुरुषांसारखे कपडे घालतात. तू असे कपडे कधीच घालू नकोस.’’
३ अ ३. चित्रपटातील गीतांच्या गाण्यावर नाच न करणे : शाळेच्या स्नेहसंमेलनात चित्रपटातील गीतांच्या गाण्यावर नाच करायचा असेल, तर तो त्यात भाग घेत नाही; मात्र स्तोत्रपठण आणि कवितावाचन या कार्यक्रमांत भाग घ्यायला त्याला आवडते.
३ आ. शाळेतील शिक्षकांनी ‘देवांश एकपाठी आहे’, असे सांगितले.
३ इ. समजूतदार : दळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊन’च्या) २ – ३ मासांच्या काळात देवांशने बाहेर जाण्यासाठी कधी हट्ट केला नाही. मी सेवेत, तसेच देवांशचे बाबा कार्यालयाच्या कामात व्यस्त असतांना तो एकटाच खेळत रहातो.
३ ई. देवांश करत असलेली साधना
१. आम्ही नामजपाला बसलो की, देवांश नामजप करायला बसतो.
२. तो नियमित ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पहातो. एका वर्गात दिवसभरात झालेल्या चुका लिहायला सांगितल्यावर त्याने एका वहीत त्या लिहिल्या. त्याविषयी त्याला काहीही ठाऊक नसतांना त्याने दिवसभरात झालेल्या चुकीच्या कृतींचे निरीक्षण योग्य प्रकारे केले होते.
४. देवांशमध्ये असणारे दोष
हट्टीपणा, राग येणे आणि निष्काळजीपणा.’
– सौ. राजश्री प्रभु (देवांशची आई)
‘प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण, तुम्हाला अपेक्षित असे संस्कार या बाळामध्ये रुजवून त्याला ईश्वरी राज्यात आदर्श साधक बनवण्यासाठी तुम्हीच आम्हाला शक्ती अन् बुद्धी द्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना ! हे श्रीकृष्णा, या बाळाच्या माध्यमातून तुझ्या लीला तू आम्हाला सतत अनुभवण्यास देतोस. याविषयी आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सौ. राजश्री प्रभु आणि श्री. सिद्धेश प्रभु (देवांशचे आई-वडील), डोंबिवली, ठाणे. (६.६.२०२०)
(सध्या प्रभु कुटुंब मडगाव, गोवा येथे वास्तव्यास आले आहे. – संकलक)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |