सतत आनंदी राहून इतरांना आनंद देणारी, ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. गार्गी अमित पेंडसे (वय ६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. गार्गी पेंडसे आणि चि. देवांश प्रभु हे दोघे आहेत !
आज श्रावण कृष्ण पक्ष दशमी (१.९.२०२१) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. गार्गी अमित पेंडसे हिचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
कु. गार्गी अमित पेंडसे हिला सहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. वय – २ ते ४ वर्षे
१ अ. मोठ्यांना नमस्कार करणे : ‘कु. गार्गी प्रतिदिन अंघोळ झाल्यावर देवता, श्री गजानन महाराज आणि घरातील मोठ्यांना नमस्कार करते.
१ आ. हुशार आणि प्रगल्भ : गार्गी पुष्कळ हुशार आणि प्रगल्भ असून ‘ती स्वतंत्र विचारांची आहे’, असे जाणवते. कितीही कठीण गोष्ट असली, तरी ती तिला स्वतः शिकून करून बघायची इच्छा असते.
१ इ. उत्तम निरीक्षणक्षमता : तिची निरीक्षणक्षमता पुष्कळ चांगली असल्याने ‘आम्हाला जे दिसत नाही किंवा जाणवत नाही’, त्या गोष्टी तिला पटकन आणि सहजतेने जाणवतात.
१ ई. संगीत आणि नृत्य यांची आवड : गार्गीला संगीत आणि नृत्य यांची पुष्कळ आवड असल्याने कुणीही न शिकवता ती वेगवेगळ्या गाण्यांवर स्वतः नृत्य करण्याचा प्रयत्न करते.
१ उ. खेळण्यातील प्राण्यांशीही प्रेमभावाने बोलणे : गार्गीला प्राण्यांची पुष्कळ आवड आहे. तिच्या खेळण्यातील प्राण्यांशी ती व्यक्तीप्रमाणे बोलते. प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करते आणि त्यांना स्वतःजवळ झोपवते. तिला गायीला चारा द्यायला पुष्कळ आवडते.
२. वय – ४ ते ५ वर्षे
२ अ. हसतमुख आणि आनंदी : गार्गी सतत आनंदी, उत्साही आणि हसतमुख असते. तिच्याकडे पाहिल्यावर आपल्यालाही आनंदी आणि उत्साही वाटू लागते. तिच्यामुळे निराशा दूर होऊन वातावरण आनंदी आणि हलके होते.
२ आ. गोड हसून जवळीक साधणे : कुणाशीही बोलतांना गार्गी गोड हसून बोलते. त्यामुळे ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. आपल्या प्रेमळ हसण्याने ती पटकन जवळीक साधते.
२ इ. सुस्पष्ट बोलणे : गार्गी शुद्ध बोलते. ‘इतक्या लहान वयातही तिचे उच्चार शुद्ध आणि स्पष्ट आहेत’, हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटते.
२ ई. गार्गीची स्मरणशक्ती चांगली आहे. तिला कुणीही प्रश्न विचारल्यास ती प्रसंगावधान राखून उत्तर देते.
२ उ. नेतृत्व गुण : काही साधकांना तिला भेटल्यावर आणि तिच्याशी बोलल्यावर ‘तिच्यात नेतृत्व गुण आहे’, असे जाणवते.
२ ऊ. प्रेमभाव : घरी कुणाला काही लागले असेल, तर ती लगेच त्यांना औषध लावते. ती आजी-आजोबांना त्यांचे औषध घ्यायची आठवण करून देते.
२ ए. चुकांप्रती गांभीर्य : गार्गीकडून चूक झाल्यास आणि झालेली चूक तिला समजावून सांगितल्यावर ती क्षमा मागते. ती नेहमी खरे बोलते आणि कुणाची चूक असेल, तर न घाबरता त्याला दाखवून देते.
२ ऐ. श्रीकृष्णाप्रती भाव : तिला श्रीकृष्ण पुष्कळ आवडतो. ती सतत त्याच्याविषयी प्रश्न विचारत असते. ‘माझ्या स्वप्नात श्रीकृष्णबाप्पा आणि देवता येतात’, असे गार्गी सांगते. एकदा तिने ‘माझे ‘गार्गी’ नाव बदलून ‘श्रीकृष्ण’ नाव ठेव. मला श्रीकृष्णासारखे व्हायचे आहे. मला त्याच्यासारखे कपडे घाल आणि सुदर्शनचक्र आणून दे’, असा पुष्कळ हट्ट केला आणि रडू लागली. तिला शांतपणे समजावून सांगितल्यावर ती शांत झाली.
३. स्वभावदोष
भ्रमणभाषवर खेळ खेळणे, मोठ्याने बोलणे, हट्टीपणा आणि मनासारखे न झाल्यास राग येऊन हातातल्या वस्तू खाली टाकणे.’
– श्री. अमित पेंडसे आणि सौ. चित्रा पेंडसे (गार्गीचे वडील आणि आई), डोंबिवली, ठाणे. (१२.६.२०२०)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |