सरकारने मंदिरे लवकर उघडली नाहीत, तर मंदिराबाहेर घंटानाद करू ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – कोरोनाची लाट यायला हा काय समुद्र आहे का ? कुठे काही जाणवत आहे का तुम्हाला ? उगीच इमारती सील करायच्या. यापूर्वी या देशात कधी रोगराई आली नव्हती का ? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे चालू आहे. सरकारने मंदिरे लवकरच न उघडल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, अशी चेतावणी राज ठाकरे यांनी दिली. सर्व राजकीय कार्यक्रम चालू असतांना सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातली आहे, याचा निषेध करत मनसेने ठिकठिकाणी दहीहंडी साजरी केली. यामुळे काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट या दिवशी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ? भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करून अभिषेक केला. असे सत्ताधार्यांसाठी नियम वेगळे आहेत का ? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का ? राज्यात सर्व कामे व्यवस्थित चालू आहेत. महापौरांच्या बंगल्यावर नियमित विकासकांची वाहने येतांना दिसतात. लोकांना कोरोनाचे कारण देऊन केवळ भीती घालण्याचे काम चालू आहे. मी बाहेर पडतो आहे आणि माझ्या लोकांनाही मी तसे सांगितले आहे.’’