निरोगी आरोग्यासाठी केळीच्या पानावर जेवण ग्रहण करणे लाभदायक !
हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे ! – संपादक
नवी देहली – हिंदु संस्कृतीमध्ये केळीच्या पानावर जेवणाची प्राचीन परंपरा आहे. ती काळाच्या ओघात विलुप्त होत असली, तरी अजूनही दक्षिण भारतात काही ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. तेथे काही उपाहारगृहांमध्ये अन्न पदार्थ वाढण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करतात. ‘ओणम’ सारख्या सणाच्या वेळी तेथे जेवणासाठी आवर्जून केळीच्या पानांचा वापर करतात. केळीच्या पानांवर जेवण करण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असली, तरी त्यामागे आयुर्वेदाची काही कारणेही आहेत.
१. केळीच्या पानांमध्ये ‘प्लान्ट बेस्ड कंपाऊंड’ (वनस्पती आधारित संयुगे) अधिक प्रमाणात असतात.
२. केळीच्या पानांमध्ये आढळणारे ‘पॉलीफेनॉल’ किंवा ‘एपिगॅलोकेटॅचिन गॅलेट’ किंवा ‘ईजीसीजी’ म्हटले जाणारे हे घटक ‘ग्रीन’ चहामध्ये आढळतात. यातून व्यक्तीला नैसर्गिक ‘ॲन्टिऑक्सिडिन्ट’ (संग्रहित अन्न उत्पादनांच्या खराबतेचा प्रतिकार करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ) मिळतात. त्यामुळे ‘फ्री रॅडिकल्स’ (मुक्त धातू) अल्प होतात आणि आजारपण येत नाही.
३. केळीचे पान खाणे शक्य नसते; परंतु त्यावर गरम पदार्थ ग्रहण केल्याने त्यातील पौष्टिक घटक पोटात जातात. केळीच्या पानातील जंतूविरोधक घटक पदार्थात किटाणू असल्यास त्यांना नाश करतात.
४. केळीच्या पानावर एक मेणासारखा अतिशय सूक्ष्म पापुद्रा असतो. पानावर गरम जेवण वाढल्यानंतर हा पापुद्रा वितळतो आणि जेवणाला चांगली चव येते.
५. प्रतिदिन केळीच्या पानांवर जेवल्याने आरोग्य चांगले रहाते. त्वचारोग, बद्धकोष्ठता यांसारखे रोग होत नाहीत.
६. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केळीच्या पानांचे विघटन लवकर होत असल्याने ते पर्यावरणपूरक आहे.