प्रेमभाव आणि गुरुंप्रती श्रद्धा असलेल्या जत, जिल्हा सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !
१. सातत्य
‘आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती त्यात कधीही पालट करत नाही. तिचे व्यष्टी साधनेतही सातत्य आहे. ती पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करून नंतरच नित्य कर्मे करत असे. आताही या वयात (७३ वर्षे) ती तरुणांना लाजवेल, अशी कामे नित्य नेमाने करते.
२. कौटुंबिक दायित्व निभावणे
आईच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, तरी ती स्थिर होती. आईचे दीर आणि जाऊ यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंत सर्व दायित्व आईने पूर्ण केले. आईने आमच्यावरही चांगले संस्कार करून आम्हाला साधनापथावर आणले. आम्ही पाच बहिणी आणि दोन जावई सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. आमचा भाऊ आधुनिक वैद्य असून प्रासंगिक सेवा करतो.
३. चांगले संस्कार करणे
ती आम्हाला नेहमी सांगायची, ‘‘आपली धन-दौलत सगळे घेऊन जातील; पण प्रारब्ध कुणी नेत नाही. आपल्या नशिबात जे आहे, ते आपल्याला मिळतेच.’’ आम्हाला पण ती ‘सतत करत रहा’, असे सांगते. ती आमच्या सासरच्या गोष्टीत कधीच हस्तक्षेप करत नाही. ती आम्हाला अधिक वेळा भ्रमणभाष करत नाही. ‘सर्व जण साधनेत आहेत आणि गुरुदेवांनी सर्वांना चांगलेच ठेवले आहे. मी काय बोलणार ?’, असा तिचा विचार असतो.
४. सकारात्मक
आई सर्व प्रसंगात सकारात्मक विचार करते. ती आम्हालाही नकारात्मक विचारांपासून परावृत्त करते. ‘आपल्याकडे जे नाही, त्यापेक्षा जे आहे, त्याचा विचार करावा’, असे ती सांगते.
५. प्रेमभाव
साधक घरी आल्यावर आई त्यांना काहीतरी खाऊ देते. साधिका ‘वाघकाकूंकडे आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटते’, असे म्हणतात. आईने ३० वर्षे परिचारिका म्हणून स्वतःच्या रुग्णालयात अन्य महिलांचे बाळंतपण करण्याची सेवा केली आहे. ती महिलांची काळजी घ्यायची. कुणाचा डबा घरून आला नसल्यास ती त्यांना दूध-भात देत असे.
ती महिलांना ‘तुम्ही देवाचे नाव घ्या. देव तुम्हाला यातून सोडवेल’, असा धीर द्यायची. समाजातील पुष्कळ जण ‘तुमची आई म्हणजे देवीच आहे’, असे सांगतात.
६. आसक्ती नसणे
आईला कपडे, अलंकार यांची आसक्ती नाही. तिच्या जवळ जे आहे, त्यात ती समाधानी आहे. ‘ती स्वतःहून तिला काही आणायला किंवा खरेदी करायला दुकानात गेली आहे’, असे नाही. नातेवाइकांनी तिला साड्या दिल्यास ती त्या आश्रमात अर्पण करते. ‘मला आवश्यक आहे, ते गुरूंनी दिले आहे. माझ्याकडे अधिक ठेवून काय करायचे’, असा तिचा दृष्टीकोन असतो.
७. सेवाभाव
घरी माझी वृद्ध आजी होती. १७ वर्षांपूर्वी तिचा एक पाय गुडघ्याच्या खालून काढला होता. अलिकडे २ वर्षे ती अंथरुणातच असल्याने आईला तिचे सर्व करावे लागायचे. आईने वयाच्या ७१ – ७२ व्या वर्षी आजीचे सर्व केले. आजीचाही तिच्यावर फार जीव होता. त्या दोघी सासू-सून नसून माय-लेकीसारख्या होत्या.’
– सौ. विनया चव्हाण (मुलगी)
८. व्यष्टी साधना
‘सासूबाईंचा ‘स्वाध्याय’ परिवार या आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ झाला. त्यांनी तेथेही मनापासून सेवा केली. तेथे घेतल्या जाणार्या परीक्षेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन त्या उत्तीर्ण झाल्या. घरात कोणताही कार्यक्रम असला, तरी त्या व्यष्टी साधना पूर्ण करूनच झोपतात. त्या नृसिंहवाडी येथील दत्ताची नियमित स्वरूपात मानसपूजा करतात. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानसपूजा करतात. त्या गुरुदेव आणि कृष्ण यांच्याशी बोलतात. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर निरागस आणि शरणागतभाव जाणवतो.’
– श्री. विनायक चव्हाण (जावई)
९. सेवेची तळमळ
अ. ‘आईच्या मणक्याचे शस्त्रकर्म झाल्याने तिला शारीरिक सेवा करायला मर्यादा येतात; पण तिची तळमळ असल्याने ती गुरुपौर्णिमेपूर्वी १ मास सहसाधिकेसह ‘अर्पण गोळा करणे, अंक वितरण करणे’, अशा सेवा खंड पडू न देता करते.
आ. गुरुपौर्णिमेनंतर तिची समष्टी सेवा होत नसे. एका साधिकेने त्यांच्या चिकित्सालयात आईला फलक लेखन करून लावायला सांगितले. तेव्हा तिने लगेच होकार देऊन सेवेला प्रारंभ केला.
१०. गुरूंप्रती श्रद्धा
तिच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले; पण प्रत्येक प्रसंगात ती स्थिर होती. ती नेहमी म्हणते, ‘‘गुरुदेव आहेत. आपण काळजी करणारे कोण ?’’ बाबांचा दोन वेळा अपघात होऊन ते मिरज येथे रुग्णाईत होते. तेव्हा तशा स्थितीतही ती समष्टी सेवेला जात होती.
– सौ. विनया चव्हाण (मुलगी)
११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कौतुक करणे
पूर्वी एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तिथे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आई त्यांना म्हणाली ‘‘आपण आमच्या जीवनात आलात, आम्ही धन्य झालो. आम्ही भरून पावलो.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी तिचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘बघा यांचे कसलेही गार्हाणे नाही. असे पाहिजे.’’
१२. जाणवलेले पालट
आईच्या सहवासात पुष्कळ चांगले वाटते. तिच्या खोलीत बसल्यावर एका पोकळीत बसल्यासारखे वाटते. ती प्रार्थना आणि कृतज्ञता सांगतांना चांगले वाटते.
‘हे गुरुमाऊली, अशा माऊलीच्या पोटी जन्माला घालून तुम्हीच आम्हाला साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण दिलेत. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. विनया चव्हाण, जत, सांगली. (२५.८.२०२०)