पू. जयराम जोशीआबा यांच्या सत्संगात अनुभवलेली त्यांची निरपेक्ष प्रीती आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला त्यांचा कृतज्ञताभाव !

‘मी मूळची सोलापूर येथील असून वर्ष २०१७ मध्ये मी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हा मी सनातन आश्रम, मिरज येथे जाऊन सेवा करायचे. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये मी ४ – ५ मास मिरज आश्रमात वास्तव्यास होते. तेव्हा मी पू. जयराम जोशी (पू. आबा) यांची कृपा अनुभवली. त्यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती गुरुचरणी अर्पण करते.

पू. जयराम जोशी

१. मिरज आश्रमात रहात असतांना आलेल्या अनुभूती आणि पू. आबांची अनुभवलेली प्रीती

१ अ. पू. आबांनी स्वतःहून प्रेमाने विचारपूस करणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भाव जागृत होणे : आश्रमात गेल्यावर आरंभी ‘पू. जोशीआबांशी कसे बोलू ?’, या विचाराने मी त्यांच्याशी अधिक बोलत नसे. त्यांची भेट झाल्यावर मी मनातल्या मनात प्रार्थना करायचे आणि त्या वेळी पू. आबा स्वतःहूनच माझी विचारपूस करायचे. संध्याकाळी भेट झाल्यावर ते मला ‘जेवलीस का ?’, असे प्रेमाने विचारायचे. त्यांचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत व्हायचा.

१ आ. महाविद्यालयात दुपारी पू. आबांची पुष्कळ आठवण येणे आणि त्या वेळी आश्रमात पू. आबांनी चौकशी केल्याचे कळणे : होळीच्या दिवशी आश्रमात पू. आबांचा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा मी महाविद्यालयात गेले होते. मला दुपारी १२.३० वाजता पू. आबांची पुष्कळ आठवण येऊ लागली. ‘पू. आबा माझ्यासाठी किती करतात ?’, याविषयी कृतज्ञता वाटून मला पुष्कळ रडायला येत होते. त्याच वेळी पू. आबांनी ‘स्नेहल कुठे आहे ?’, असे विचारले’, असे मला नंतर कळले. यावरून ‘बिंब-प्रतिबिंब कसे असते ?’, याची देवाने मला अनुभूती दिली.

१ इ. रंगपंचमीला पू. आबांना रंग लावतांना ‘साक्षात् कृष्णाला रंग लावत आहे’, असे वाटणे : रंगपंचमीला मी आणि सर्व बालसाधक आश्रमात एकेमकांना रंग लावत होतो. सर्व साधक एकमेकांना कोरडा रंग लावत होते. त्या वेळी आम्हाला पू. आबांना रंग लावता येऊन गुरुदेवांच्या कृपेने साक्षात् कृष्णाला (‘पू. आबा श्रीकृष्ण आहेत’, असा साधिकेचा भाव आहे.’ – संकलक) स्थुलातून रंग लावण्याचा आनंद घेता आला. या लहानशा कृतीतून त्यांनी आम्हा साधकांवर प्रीतीचा वर्षाव केला. ते संत असूनही नेहमीच सहज स्थितीत असतात.

१ ई. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या चरित्रग्रंथातील गुरुचरणांचे चित्र पाहिल्यावर ‘ते पू. आबांचेच चरण आहेत’, असे वाटणे : ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या चरित्रग्रंथात गुरुचरणांचे चित्र आहे. ते पाहिल्यावर ‘ते पू. आबांचेच चरण आहेत’, असे मला वाटले आणि ‘पू. आबा अन् परात्पर गुरु डॉक्टर एकच आहेत’, असे मला जाणवले. मला रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरुदेवांना सारखे भेटता येत नाही. त्यामुळे ‘आम्हा साधकांसाठी परात्पर गुरुदेव ‘पू. आबा’ बनून इथे आले आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

१ उ. परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा आणि महाविद्यालयातील प्रकल्पाचे (‘प्रोजेक्ट’चे) सादरीकरण एकाच दिवशी असणे अन् पू. आबांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यावर सादरीकरण एक दिवस पुढे ढकलले जाऊन सोहळा पहाता येणे : मी अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असतांना मे मासात परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा होता. सोहळ्याच्या दिवशी, म्हणजे शनिवारी मला महाविद्यालयात अंतिम प्रकल्प (‘प्रोजेक्ट’) सादर करायचा होता. त्यासाठी मला उपस्थित रहाणे आवश्यक होते; कारण त्याखेरीज मी उत्तीर्ण होणे शक्य नव्हते. मला त्या दिवशीचा सोहळाही बघायचा होता. त्यामुळे मी पू. आबांच्या खोलीत जाऊन त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘‘तू सारखे देवाला सांग, ‘देवा, मला हा सोहळा बघायचा आहे. तूच काहीतरी कर.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रार्थना करू लागले. नंतर मला महाविद्यालयातून कळले, ‘मला रविवारी प्रकल्प (प्रोजेक्ट) सादर करायचा आहे.’ खरेतर रविवारी ही परीक्षा कधीच नसते; पण पू. आबांच्या संकल्पामुळे परीक्षा एक दिवस पुढे ढकलली गेली आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा दैवी भावसोहळा पहाता आला.

सौ. स्नेहल पाटील

१ ऊ. विशेष अभ्यास न करताही पू. आबांच्या संकल्पामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे : पू. आबांची नात कु. ऐश्वर्या आणि मी एकत्र अभ्यास करायचो. बर्‍याच वेळा सेवेमुळे माझा अभ्यास राहून जायचा. एकदा गंमतीत ऐश्वर्या पू. आबांना म्हणाली, ‘‘आबा, तिला अभ्यास करायला सांगा ना !’’ तेव्हा पू. आबा म्हणाले, ‘‘तिला आवश्यकता नाही. सर्व नीट होईल !’’ त्यांच्या या संकल्पामुळेच मी सेवा करत थोडा अभ्यास केला आणि अभियांत्रिकीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकले. गुरुकृपेने आमच्या महाविद्यालयात ‘इलेक्ट्रोनिक्स’ या शाखेत (‘ब्रँच’मध्ये) माझा द्वितीय क्रमांक आला.

१ ए. एका प्रसंगाद्वारे अनुभवलेली पू. आबांमधील तत्त्वनिष्ठता ! : एकदा मी पू. आबांना जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा पू. आबा आणि भाग्यश्रीताई (पू. आबांच्या सूनबाई) यांनी ‘ऐश्वर्या कुठे न्यून पडते ?’, ते सांगून ‘तिला कसे साहाय्य करता येईल ?’, हे मला प्रेमाने सांगितले. यातून मला पू. आबांची तत्त्वनिष्ठता शिकता आली. ते स्वतःच्या नातीला ‘साधक म्हणून साधनेत कसे साहाय्य करतात ?’, हे मला शिकता आले.

१ ऐ. पू. आबांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि त्यांनी सांगितलेली सूत्रे ! : आश्रमात असतांना एकदा मला माझ्या बाबांचे आजारपण आणि घरातील आर्थिक अडचणी यांमुळे भावनाप्रधान होऊन रडू येत होते. त्या रात्री मी पू. आबांच्या खोलीत गेले आणि मला पू. आबांचा मोठा सत्संग मिळाला. ते प्रत्येक वाक्यात सतत ‘परात्पर गुरुदेव पुष्कळ करतात. त्यांचे आपल्याकडे पुष्कळ लक्ष आहे !’, असे म्हणतात. त्यांच्या या वाक्यात इतका कृतज्ञताभाव असतो की, ऐकणार्‍या प्रत्येकाचाच भाव जागृत होतो. या अमूल्य सत्संगात पू. आबांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘कोणतीही सेवा असू दे, ती मनापासून करायची. मनापासून केलेली सेवा देवापर्यंत पोचते.

२. मी (पू. आबा) रामनाथी आश्रमात होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ते जेवत असतांना मला बोलावले. ते मला म्हणाले, ‘‘मी तुम्हाला गप्पा मारायला बोलावले.’’ परात्पर गुरु डॉक्टर आपल्यासाठी पुष्कळ करतात !

३. एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मिरज आश्रमात आल्या होत्या. त्या मला (पू. आबांना) म्हणाल्या, ‘‘तुम्ही कोणत्याच अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे देवाने तुम्हाला लवकर पुढे नेले !’’

त्या वेळी पू. आबा त्यांच्या जीवनातील सर्व महत्त्वपूर्ण घटना दिनांक आणि वर्ष यांसह मला सांगत होते. ते मला गुरुमहिमाच सांगत होते. त्यामुळे आपोआप माझा भाव जागृत होत होता. पू. आबा प्रत्येक वाक्यानंतर कृतज्ञता व्यक्त करत होते. त्यांच्यामध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व केले’, हा कृतज्ञताभाव मला प्रत्येक क्षणी जाणवत होता. माझ्यासारख्या छोट्या जिवाला ‘संतांचा हा एवढा मोठा दैवी सत्संग लाभणे’ ही माझ्या साधनेसाठी मिळालेली अमूल्य भेटच आहे.

२. नोकरीसाठी पुण्याला एकटे रहात असतांना पू. आबांच्या बोलण्यामुळे मोठा आधार मिळणे

जुलै २०१९ मध्ये माझ्या वडिलांचे सोलापूर येथे देहावसान झाले आणि त्यानंतर एका आठवड्यातच मला नोकरीसाठी पुण्याला जावे लागले. तेव्हा पहिल्या दिवशी मला एकटे वाटून पुष्कळ रडू येत होते. त्या दिवशी भ्रमणभाषवर पू. आबांशी बोलतांना ते मला म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस. देव सतत तुझ्या सोबत आहे.’’ त्यांच्या या वाक्याने मला पुष्कळ आधार मिळाला.

३. मिरज आश्रमात ‘पू. आबांच्या चरणांना स्पर्श करतांना ‘साक्षात् परात्पर गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करत आहे’, असे जाणवणे

डिसेंबर २०१९ मध्ये मी पुण्याहून कोल्हापूर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी गेले होते. त्यानंतर पू. आबांना भेटण्यासाठी मी मिरज आश्रमात गेले. त्या वेळी ‘मला त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे’, असे वाटत होते. काही वेळाने माझी ती इच्छा पूर्ण होऊन मला पू. आबांच्या चरणांचा दैवी स्पर्श घेता आला. तेव्हा ‘साक्षात् परात्पर गुरुदेवांच्या चरणांनाच मी स्पर्श करत आहे’, असे मला जाणवत होते. नंतर पुण्याला परत आल्यावर प्रतिदिन माझ्या हातांकडे बघून ‘या हातांना पू. आबांच्या चरणांचा स्पर्श झाला आहे आणि यातून मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटायचे.

३ अ. पू. आबांचा चरणस्पर्श आठवत कार्यालयात भावपूर्ण काम केल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुक करणे आणि नोकरीत चांगले काम केल्याने एक पारितोषिक (‘ॲवार्ड’) मिळणे : फेब्रुवारी २०२० मध्ये पुण्यातील सभेच्या सेवेला आरंभ झाला. मी नोकरी करत सेवाही करत होते. एकदा अकस्मात् कार्यालयात पुष्कळ काम आले. तेव्हा मी ‘देवा, मला सेवा करायची आहे. तूच मला साहाय्य कर’, अशी देवाला प्रार्थना केली. मी हाताकडे बघत आणि पू. आबांचा चरणस्पर्श आठवत सेवा अन् नोकरी करत होते. सभेच्या सेवेतून मला पुष्कळ आनंद मिळाला. सभेच्या काळात ‘मी नोकरीत चांगले काम केले’; म्हणून मला एक पारितोषिक (‘ॲवार्ड’) मिळाले. मी आणि एका सहकार्‍याने मिळून अल्प वेळेत ते पूर्ण केले होते. याविषयी आमच्या ‘कंपनी’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) यांनी पुष्कळ कौतुक केले. प्रत्यक्षात मी नोकरी करायला लागून केवळ सहाच मास झाले होते आणि त्या कामाचा मला काहीच अनुभव नव्हता. पू. आबांचा चरणस्पर्श आठवत भाव ठेवून ते काम केल्यानेच माझे कौतुक झाले. देवाच्या कृपेने संतांच्या चैतन्याची ही मोठी अनुभूती मला घेता आली. त्याबद्दल पू. आबा आणि श्री गुरु यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

४. पू. आबांच्या आठवणीने स्फुरलेली कविता !

एकदा मला पू. आबांची पुष्कळ आठवण येत होती. तेव्हा त्यांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करते.

पू. आबा आहेत श्री गुरूंचेच दुसरे रूप ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने अस्थिर मन स्थिर होत असे ।
ज्यांची वाणी ऐकताक्षणी मन आनंदून जात असे ।। १ ।।

ज्यांच्या दर्शनाने डोळे भावाश्रूंनी भरून जात असती ।
ज्यांच्या पदस्पर्शाने अनेक जन्मांची पापे नष्ट होऊन ।
जिवाचा उद्धार होत असे ।
असे आमचे पू. आबा असती ।। २ ।।

पू. आबा आमचे श्रीकृष्णच आहेत ।
पू. आबा आमचे श्रीराम आहेत ।
तेच श्रीविष्णुही आहेत ।
कारण तेच श्री गुरूंचे (टीप १) दुसरे रूप आहेत ।। ३ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉक्टरांचे

‘हे गुरुराया, पू. आबांच्या रूपात तुम्हीच माझ्यावर सतत कृपा करत आहात. पू. आबांकडून मला सतत शिकता येऊ दे. त्यांच्यात असलेला कृतज्ञताभाव, निरपेक्ष प्रीती, मनापासून सेवा करणे आदी दैवी गुण माझ्यात येण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करवून घ्या’, अशी शरणागतीने प्रार्थना आहे.’

श्रीकृष्णाच्या चरणांची धूळ होण्याची इच्छा असलेली,

– सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीची कु. स्नेहल गुब्याड, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), पुणे (मार्च २०२१)

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक