महाराष्ट्रात ‘मराठी भाषा विद्यापिठा’साठी समिती नियुक्त करण्यात येणार !

नागपूर – मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी लक्षात घेऊन याविषयी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ८-१० दिवसांत समितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून समितीच्या अहवालानंतर विद्यापीठ निर्मितीच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील विद्यार्थी संस्कृतमध्येही पारंगत व्हावेत, यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने ‘संस्कृत वक्तृत्व स्पर्धा’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १३ विद्यापिठांतून १३ स्पर्धक निवडून त्यांच्यात राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेतील यशस्वींना ५१, ३१ आणि १५ सहस्र रुपये, असे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार, तसेच सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. राज्यातील शासकीय महाविद्यालयांमधील अनेक प्रकारचे शुल्क अल्प करण्यात आले आहेत. खासगी अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील शुल्क अल्प करण्याविषयी राज्य सरकारला थेट हस्तक्षेप करता येत नाही; पण राज्य सरकारने ‘एफ्.आर्.ए.’ची समिती आणि ‘आय.ए.एस्.’ अधिकारी चिंतामणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २ समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.’’