पंढरपूर येथे २ मासांमध्ये २ सहस्र ७६७ घरांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य अळ्या आढळल्या !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य संसर्गाचे प्रमाण वाढण्यास प्रारंभ झाला आहे. शहरात २ मासांमध्ये २ सहस्र ७६७ घरांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य अळ्या आढळून आल्या आहेत, अशी माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे जीवशास्त्र अधिकारी किरण मंजुळे यांनी दिली. मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये पंढरपूर शहर अन् तालुका येथे पुष्कळ प्रमाणात रुग्ण आढळले आहेत, तसेच पंढरपूर तालुक्यातील २१ गावांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून मागील दोन मासांपासून २३ सहस्र घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील २ सहस्र ७६७ घरांमध्ये वापरण्यात येणार्‍या पाण्यामध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यू सदृश्य अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य आजार पंढरपूर शहरात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून पंढरपूर शहर आणि उपनगर येथे घरोघरी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून डेंग्यू अन् चिकनगुनिया सदृश्य अळ्या पाण्यामध्ये निर्माण होऊ नयेत, यासाठी फवारणी करण्यावर भर दिला जात आहे.