भारतात हिंदू स्वतंत्र असले, तरी सुरक्षित नाहीत ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, संस्थापक, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद
नागपूर – गेल्या दीड सहस्र वर्षांचा भारताचा इतिहास आक्रमण आणि अतिक्रमण यांचा आहे. भारतीय संस्कृतीवर वेळोवेळी आक्रमणे करण्यात आली. त्या काळी असलेला धोका आजही कायम आहे. भारतात हिंदू स्वतंत्र असले, तरी सुरक्षित निश्चितच नाहीत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी २८ ऑगस्ट या दिवशी येथे केले. आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या विदर्भ प्रांताद्वारे ‘कार्यकर्ता संमेलन आणि अखंड भारत संकल्प दिवसा’चे आयोजन येथील गणेश पेठेतील गुरुदेव सेवाश्रमात करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले, ‘‘अखंड भारताचा विचार करत असतांना आपण केवळ पाकिस्तानचा विचार करतो. वास्तविक एकेकाळी अफगाणिस्तानही भारताचाच भाग होता, हे आपण विसरता कामा नये. आज तेथे काय चालू आहे ? हे सर्व जग पहात आहे. येत्या ४० वर्षांत अशीच स्थिती भारतात उद्भवू शकते. हिंदू सुरक्षित राहिले नाहीत, तर भारताचे तालिबानीकरण होण्यास वेळ लागणार नाही. देशात तालिबानी विचार वाढू लागले आहेत. हे विचार पसरवणार्यांना रोखण्याची आज खरी आवश्यकता आहे. त्यासाठी आमचे संघटन काम करणार आहे. यासह एकही गरीब उपाशीपोटी झोपू नये, यासाठी आम्ही प्रत्येक गावात ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रमही राबवणार आहोत.’’