श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजपादी उपाय करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘२.११.२०१६ या दिवशी मला बरे वाटत नव्हते. ३ – ४ आठवड्यांपासून मला खोकला झाला होता आणि संपूर्ण शरिरात वेदना होत होत्या. मला आध्यात्मिक उपाय करण्यासाठी बसवतही नव्हते. मी पलंगावर बसून श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्राकडे पाहून आध्यात्मिक उपाय करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मला श्रीकृष्णाच्या कृपेने आदल्या रात्री व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात अमेरिकेतील साधक श्री. सोमनाथ परमशेट्टी यांनी सांगितलेल्या उपायांची आठवण झाली. त्यांनी सांगितले होते, ‘‘आपल्या शरिराच्या एखाद्या भागात त्रास किंवा वेदना होत असतील, तेव्हा चित्रातील श्रीकृष्णाच्या शरिराच्या त्या भागाकडे पाहून नामजपादी उपाय करावेत.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मीही श्रीकृष्णाच्या शरिराकडे पहात नामजप करू लागले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. नामजपाच्या वेळी श्रीकृष्णाच्या प्रत्येक अवयवाशी एकरूप होतांना जाणवलेली सूत्रे
१ अ. श्रीकृष्णाच्या घशाकडे पाहून नामजप करतांना स्वतःचा घसा श्रीकृष्णाप्रमाणे निळ्या रंगाचा दिसून तो जंतूविरहित झाल्याचे जाणवणे : मला फार खोकला झाला होता आणि घसा खवखवत होता; म्हणून आरंभी मी श्रीकृष्णाच्या घशाकडे पाहू लागले. त्या वेळी मला ‘माझा घसा श्रीकृष्णाच्या निळ्या घशाशी एकरूप होत आहे’, असे दिसले. ‘श्रीकृष्णाचा घसा सुंदर आणि उत्कृष्ट असल्याने तिथे रोगजंतू असू शकत नाहीत. आता माझा घसा त्याच्या घशाशी एकरूप झाला असल्यामुळे माझ्या घशातही रोगजंतू असणार नाहीत’, असा विचार माझ्या मनात आला. या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता आणि आश्चर्यही वाटले. त्यानंतर माझ्या मनात दुसरा विचार आला, ‘मला माझ्या शरिरावर स्वतःच्या घशाऐवजी श्रीकृष्णाचा निळा घसा दिसत आहे.’ तेव्हा मला माझा घसा निळ्या रंगाचा दिसला.
१ आ. स्वतःच्या एखाद्या अवयवाला वेदना होत असतांना श्रीकृष्णाच्या त्या भागाशी एकरूप होऊन नामजप करतांना ‘तो अवयव श्रीकृष्णाचा असल्याने वेदना होऊ शकत नाही’, असा विचार मनात येणे : अशा प्रकारे हळूहळू माझ्या शरिराच्या ज्या भागावर वेदना होत होत्या, त्या प्रत्येक भागासाठी (अवयवासाठी) मी असाच प्रयोग केला. प्रारंभी माझ्या शरिराचा त्रास होत असलेला भाग (अवयव) श्रीकृष्णाच्या अवयवाशी एकरूप होत असल्याची अनुभूती मला येत असे आणि नंतर ‘तो अवयव श्रीकृष्णाचा असल्याने मला वेदना होऊ शकत नाही’, असा विचार मनात येत असे. त्यानंतर माझ्या शरिरावर स्वतःच्या अवयवाऐवजी श्रीकृष्णाचा निळा अवयव दिसत असे. त्या वेळी मला वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित वेगवेगळ्या अनुभूती आल्या.
१ इ. श्रीकृष्णाचे वदन आणि चरण यांविषयी जाणवलेली सूत्रे
१ इ १. श्रीकृष्णाचे वदन : श्रीकृष्ण लहान असतांना त्याने त्याच्या आईला त्याच्या तोंडात संपूर्ण विश्व सामावले असल्याचे दृश्य दाखवले होते. श्रीकृष्णाच्या हातांत एखादा पर्वत उचलू शकेल, एवढी प्रचंड शक्ती असल्याचे मला जाणवत होते.
१ इ २. श्रीकृष्णाचे चरण : त्याच्या चरणांत पुष्कळ शक्ती होती आणि ते इतके विशाल होते की, एका पावलात तो सर्व विश्व व्यापून टाकू शकत होता. असे असले, तरी भक्तांच्या समवेत नृत्य करतांना त्याचे तेच चरण अत्यंत आकर्षक दिसत होते. मी त्याच्याशी एकरूप झाले असल्यामुळे मलाही त्याच्याप्रमाणेच वाटत होते.
त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळून माझी भावजागृती झाली. मला माझ्या शरिरात वेदना जाणवत नव्हत्या. वेदना जाणवल्याक्षणी किंवा खोकला येताक्षणी मी वेदना होत असलेल्या माझ्या अवयवावर लक्ष केंद्रित करून ‘तो श्रीकृष्णाचा आहे’, असा भाव ठेवत होते आणि माझ्या वेदना अन् खोकला दूर होत होता.
१ ई. श्रीकृष्णाच्या डोक्याकडे पाहून आलेल्या अनुभूती : माझे डोके दुखत नसल्याने मी आतापर्यंत श्रीकृष्णाच्या कपाळाकडे पाहिले नव्हते; म्हणून शेवटी मी त्याच्या डोक्याकडे पाहिले. त्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले.
१. ‘माझे डोके त्याच्या डोक्याशी एकरूप होत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला ‘त्यामध्ये सर्व जण, सर्वकाही आणि संपूर्ण विश्व सामावले आहे’, असे दिसले.
२. श्रीकृष्णामधील विशालता आणि पुष्कळ प्रीती मला जाणवली. त्याच्यात प्रतिक्रियाच नव्हे, तर साधा विचारही नसल्याचे मला जाणवले. त्याच्यामध्ये सर्वांप्रती प्रीती आणि आपुलकी होती. तो सर्वांना स्वीकारून त्यांच्याकडे प्रीतीने अन् साक्षीभावाने पहात होता.
३. त्यानंतर मला ‘माझे डोके श्रीकृष्णासारखे निळे झालेले आहे’, असे दिसले आणि मलाही सर्वांविषयी आपुलकी जाणवू लागली. माझ्या मनातील प्रतिक्रिया आणि विचार नाहीसे झाले. मला केवळ पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
२. तोंड, हात, पाय आणि फुप्फुसे इत्यादींविषयी मनात विचार येऊन श्रीकृष्णाप्रमाणे सर्व व्हावेसे वाटणे अन् ते अनुभवतांना चैतन्य मिळणे
त्यानंतर माझ्या मनात माझे तोंड, हात, पाय, फुप्फुसे इत्यादींविषयी विचार येऊ लागले. ‘श्रीकृष्णाच्या तोंडाप्रमाणे माझे तोंड कसे असेल ? मी श्रीकृष्णासारखे प्रेमळ, मृदू आणि परिपूर्ण कसे बोलू शकेन ? मी माझ्या कोणत्याही अवयवाने त्याच्यासारखी कृती कशी करू शकेन ? त्याच्याप्रमाणे श्वासातून केवळ चैतन्यच कसे घेऊ शकेन ? स्वतःचेच एक अंग असल्याप्रमाणे वस्तूंना हाताळणे, कोणालाही न दुखावता, न लाथाडता काळजीपूर्वक चालणे इत्यादी गोष्टी मी कशी करू शकेन ?’, याच विचारांत मी होते.
श्रीकृष्णाच्या कृपेने मी अनुमाने ४५ मिनिटे हे अनुभवत होते. ‘या भावविश्वात सतत रहावे’, असे मला वाटत होते. यातून माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक उपाय होत होते. त्या रात्री मला झोप येईपर्यंत माझ्या मनात केवळ नामजप आणि कृतज्ञता होती.
३. एका प्रसंगात मनात प्रतिक्रिया आल्यावर स्वतःचे डोके श्रीकृष्णाप्रमाणे निळ्या रंगाचे असल्यासारखे वाटणे, ‘श्रीकृष्णाने अशा वेळी कसा विचार केला असता ?’, असा विचार मनात येणे अन् प्रतिक्रिया विरून शांतपणे नामजप करणे
दुसर्या दिवशी मी गाडी चालवत कार्यालयात जात असतांना ‘माझ्या बाजूने जाणार्या चालकाने अयोग्य कृती केली’, असे मला वाटले. ‘तो काय करत आहे ?’, हे त्याचे त्यालाच कळत नाही’, अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली. त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला, ‘माझे डोके निळे असते, तर ? या प्रसंगात श्रीकृष्णाने कसा विचार केला असता ? तो चालकही श्रीकृष्णाचाच होता; म्हणून श्रीकृष्ण कधीच वाईट विचार करणार नाही. तो सर्वांवर केवळ प्रेमच करतो.’ यामुळे माझ्या मनातील प्रतिक्रिया त्वरित गेली. मला तो प्रसंग स्वीकारता आला आणि शांत वाटले. मीच कदाचित वाहन योग्य रितीने चालवत नसेन किंवा ‘तो चालक तसा का वागत आहे ?’, हे मला ठाऊक नाही, तर मी निष्कर्ष का काढत आहे ? त्याऐवजी मी नामजपावर लक्ष केंद्रित करून आनंदात राहिले पाहिजे’, असे मला वाटले. त्यानंतर मी संपूर्ण प्रवासात शांतपणे नामजप करू शकले.
४. प्रत्येक कृतीच्या वेळी ‘आपल्या अवयवाच्या ऐवजी श्रीकृष्णाचा अवयव आहे’, असा विचार केल्याने झालेले लाभ
अ. अशा प्रकारे पुढील काही दिवस माझ्या मनात प्रतिक्रिया उमटत असतांना ‘माझे डोके श्रीकृष्णासारखे निळे झाले आहे’, असे मला दिसत होते आणि मी श्रीकृष्णाप्रमाणे विचार करू शकले. त्यामुळे माझ्या मनातील प्रतिक्रिया नष्ट होऊन मला योग्य कृती करता आल्या.
आ. मला खोकला येत असतांना ‘माझा घसा निळा आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन मी नामस्मरणावर लक्ष केंद्रित करत होते. त्यामुळे माझ्या घशातील त्रास उणावत होता.
इ. पूर्वी मला आध्यात्मिक उपाय करतांना अडथळे येत होते; परंतु आता आध्यात्मिक उपाय करतांना मला श्रीकृष्णाचा विचार करत त्याचे प्रेम आणि विशालता अनुभवता येत असल्याने उपाय करावेसे वाटतात.
‘हे श्रीकृष्णा, तू मला ही अनुभूती देऊन शिकवलेस’, त्यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करू ? ‘तुझ्यासारखे होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे तूच मला शिकव. ‘हे श्रीकृष्णा, मला तुझ्यासारखे कायमचे निळे होता येऊ दे’, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. राजल जोशी, कॅनडा (२.११.२०१६)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |