संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहातील १४ बंदीवान कोरोनाबाधित !
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती
संभाजीनगर – जिल्ह्यातील हर्सूल भागातील संभाजीनगर मध्यवर्ती विभागीय कारागृहातील १२ बंदीवानांची २९ ऑगस्ट या दिवशी कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १२ बंदीवान कोरोनाबाधित आढळले असून २ दिवसांपूर्वी २ बंदीवान आधीच कोरोनाबाधित झालेले आहेत. या माहितीला कारागृह प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही; मात्र महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘१४ बंदीवान कोरोनाबाधित आढळले आहेत’, अशी माहिती देण्यात आली आहे.
सिल्लोड, गंगापूर आदी भागांतील काही बंदीवानांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन आदेशानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. या बंदीवानांची तापमान चाचणी घेत असतांना त्यांच्यामध्ये सौम्य प्रकारची कोरोनाची लक्षणे आढळून आली. या बंदीवानांना तातडीने कारागृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार चालू असून इतर बंदीवानांविषयीही काळजी घेण्यात येत आहे. यासाठी हर्सूल कारागृह आणि महानगरपालिका यांचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.