‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे एक सुप्रसिद्ध अभिनेते, या मालिकेचे दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची घेतलेली भावस्पर्शी भेट !

मार्च २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि त्यांच्या पत्नी सौ. श्वेता क्लार्क यांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेतील अभिनेता, दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची मुंबईत भेट घेतली. श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी त्यांना साधनेविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी साधनेचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

३०.८.२०२१ या दिवशीच्या अंकात आपण ‘महाभारत’ या मालिकेतील अभिनेत्यांच्या भेटीत श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506966.html

३. अभिनेत्यांनी अध्यात्मात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेच्या टप्प्यांविषयी विचारल्यावर साधकांनी त्यांना त्याविषयी सांगणे

अभिनेते : अध्यात्मात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले साधनेचे टप्पे कोणते ?

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, नामजप आणि सत्सेवा’, असे साधनेचे प्रमुख टप्पे आहेत. तुम्ही ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करायला आरंभ करू शकता.

अभिनेते : मी हा नामजप करीन.

श्री. शॉन क्लार्क

४. अभिनेत्यांनी ‘अभिनयाच्या व्यवसायात देवाशी कसे अनुसंधान साधायचे ?’, याविषयी विचारल्यावर साधकांनी त्यांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या अध्यात्माविषयीच्या ग्रंथांचा अभ्यास करायला सांगणे

अभिनेते : मला ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा ग्रंथ हवा आहे. मी कलेच्या माध्यमातून साधना किंवा सत्सेवा कशी करू शकतो ?
अभिनयाच्या व्यवसायात पुष्कळ रज-तमात्मक वातावरण असून येथील लोक अहंकारी आहेत. त्यामुळे मला अनेक वेळा थकायला होते आणि दिशाहीन वाटते; पण हा व्यवसाय माझ्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने मी तो सोडू शकत नाही. येथे रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने देवाशी अनुसंधान साधणे अवघड होते. या व्यवसायात टिकून रहाण्यासाठी काय करायला हवे ?

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : तुम्ही प्रथम नामजप आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या अध्यात्माविषयीच्या ग्रंथांचा अभ्यास चालू करा. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेखही तुम्हाला साहाय्य करतील. तुम्हाला जेव्हा शक्य होईल, तेव्हा गोवा येथील आमच्या आश्रमाला भेट द्या.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर पहातांना अभिनेत्यांना त्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसणे

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : परात्पर गुरु डॉक्टरांनी तुमचे छायाचित्र पाहून ‘तुम्ही सात्त्विक आहात’, असे
सांगितले आहे.

(हे ऐकून त्यांची पुष्कळ भावजागृती झाली.)

अभिनेते : मला परात्पर गुरुदेवांचे दर्शन होऊ शकेल का ?

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : तुम्हाला हे हस्ताक्षर पाहून काय जाणवते ?

(आम्ही त्यांच्याकडून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे हस्ताक्षर पाहून काय जाणवते ?’, याविषयीचा सूक्ष्मातील प्रयोग करवून घेतला. प्रयोग करतांना ते परात्पर गुरु डॉक्टरांचे हस्ताक्षर असल्याचे त्यांना ठाऊक नव्हते.)

अभिनेते : माझ्यावर अनिष्ट शक्तींचे पुष्कळ आवरण असल्यामुळे माझी संवेदनक्षमता अल्प आहे; मात्र हस्ताक्षर पहातांना मला त्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसला.

तुम्हाला भेटून, तसेच तुमच्या संशोधन कार्याविषयी ऐकून मला पुष्कळ हलके आणि सकारात्मक वाटले. तुम्ही दोघे अत्यंत प्रामाणिक आहात. त्यामुळे मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकलो. मला या सकारात्मकतेची पुष्कळ आवश्यकता होती. आपण भेट म्हणून दिलेल्या ग्रंथांसाठी आणि मार्गदर्शनासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे.

‘या अभिनेत्यांनी गतजन्मात साधना केली आहे आणि या जन्मी ते पुढील मार्गदर्शनाचा शोध घेत आहेत’, असे आम्हाला वाटले.’ (‘योग्य आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

सौ. श्वेता क्लार्क

६. साधनेविषयी जिज्ञासा असणारे दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेचे दिग्दर्शक !

‘दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेचे दिग्दर्शक नवीन मालिकेच्या चित्रीकरणात पुष्कळ व्यस्त असूनही त्यांनी आम्हाला ३ घंटे वेळ दिला. आमच्या भेटीनंतर इतरांनी आम्हाला सांगितले, ‘‘हे दिग्दर्शक पुष्कळ व्यस्त असल्याने कुणालाही २० मिनिटांहून अधिक वेळ भेटत नाहीत.’’ आमच्या भेटीच्या वेळी अन्य लोक त्यांना भेटायला येत असूनही त्यांनी आम्हाला वेळ दिला. आमचे त्यांच्याशी पुढील संभाषण झाले.

६ अ. दिग्दर्शकांनी ‘मला सर्वत्र सकारात्मक स्पंदने निर्माण करायची आहेत’, असे सांगितल्यावर ‘साधना करणे’ हा सर्वत्र सकारात्मक स्पंदने निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे’, असे साधकांनी त्यांना सांगणे

दिग्दर्शक : ‘चांगली आणि वाईट स्पंदने असतात’, यावर माझा विश्वास आहे. मला सर्वत्र सकारात्मक स्पंदने निर्माण करायची आहेत, तसेच संपूर्ण जगात सकारात्मक वातावरण निर्माण करायचे आहे. मला अजून बरेच शिकायचे आहे आणि बरेच काही साध्य करायचे आहे.

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : ‘साधना करणे’ हा सर्वत्र सकारात्मक स्पंदने निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे.

६ आ. दिग्दर्शकांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे जाणून घेणे

दिग्दर्शक : साधनेचे कोणते टप्पे आहेत ?

श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : गुरुकृपायोगानुसार साधनेचे ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, सतसाठी त्याग आणि प्रीती (निरपेक्ष प्रेम)’, असे ८ टप्पे आहेत. यांविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेख वाचू शकता.

६ इ. दिग्दर्शकांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने घेण्यात येणार्‍या कार्यशाळेसाठी रामनाथी आश्रमात येण्याची इच्छा दर्शवणे

दिग्दर्शक : पूर्वी माझा देवावर पुष्कळ विश्वास होता; मात्र काही काळानंतर एका मित्राच्या प्रभावामुळे मी देवापासून लांब गेलो. सध्या मी नास्तिक आहे.

(आम्ही (श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी) त्यांना परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) साधनाप्रवास सांगितला. गुरुदेवांचा साधनाप्रवास ऐकून त्यांच्यात साधनेविषयी जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी साधना करण्याची इच्छा व्यक्त केली.)

दिग्दर्शक : मी आणि या मालिकेचे अभिनेते ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात येणार्‍या कार्यशाळेला येऊ. मला तुम्ही करत असलेले आध्यात्मिक संशोधन आणि साधना समजून घ्यायची आहे. मुंबईमध्ये तुम्हाला काही साहाय्य हवे असल्यास मी साहाय्य करू शकतो. आपण उभयतां माझ्या घरी येऊन तेथे काही दिवस रहा.

ते आमच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले. ते अत्यंत व्यस्त असूनही आम्हाला निरोप देण्यासाठी बाहेरपर्यंत आले होते.

७. व्यवसायात पुष्कळ यश संपादन केलेले असूनही नम्र, प्रेमळ आणि साधना करण्याची इच्छा असलेल्या दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेच्या संहितालेखिका !

‘दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेची संहितालेखिका माझी (सौ. श्वेता क्लार्क यांची) महाविद्यालयीन मैत्रीण आहे. ती अनेक हिंदी मालिकांचे संहितालेखन करते. तिने ‘महाभारत’ मालिकेतील अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्याशी आमची ओळख करून दिली. तिने व्यवसायात पुष्कळ यश संपादन केले असूनही ती अत्यंत नम्र आहे. तिला साधना करण्याची इच्छा आहे आणि तिने आम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करायला सांगितले.

तिने आम्हाला सांगितले, ‘‘माझ्या कुटुंबात पुष्कळ समस्या आहेत. माझ्या आईला मानसिक आजार असल्याने तिला रुग्णालयात ठेवले आहे. माझ्या यजमानांनी नोकरी सोडली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे दायित्व माझ्यावरच आहे. मला लग्नानंतर बरीच वर्षे मूलबाळ नव्हते; पण घरात एक पूजाविधी केल्यावर मला मुलगा झाला. मनोरंजनाच्या या क्षेत्रात पुष्कळ वर्षे असूनही माझा आत्मविश्वास अल्प आहे.

तुम्ही प्रसारकार्य अथवा अन्य कामे यांसाठी मुंबई येथे आल्यावर माझ्याच घरी रहायला या. माझी मनोरंजनाच्या क्षेत्रात पुष्कळ ओळख आहे. मी एका प्रसिद्ध निर्मातीच्या समवेत काम करते. त्यांना अध्यात्मात रस आहे. माझी आणि त्यांची केवळ व्यावसायिक ओळख असली, तरी मी तुमची त्यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीन.’’

त्यांनी आम्हाला आपुलकीने ‘घरी रहायला या’, असे सांगितल्यावर त्यांच्यातील ‘प्रेमभाव आणि साधेपणा’ हे गुण आमच्या लक्षात आले. आम्ही तिला आश्रमभेटीचे निमंत्रण दिले.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच कृपेने आम्हाला ही सेवा करायची संधी मिळाली. गुरुदेव, आपल्याच चैतन्याने ही सेवा पूर्ण झाली. आम्हाला काहीच करावे लागले नाही. सर्वकाही सहजतेने घडत गेले. ‘आपण सर्व साधक आणि अखिल मानवजात यांच्यासाठी जे करत आहात’, त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– श्री. शॉन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे एक सुप्रसिद्ध अभिनेते, या मालिकेचे दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची भेट घेतल्यानंतर सध्या ते करत असलेले साधनेचे प्रयत्न !

१. अभिनेते

या अभिनेत्यांनी सांगितले, ‘‘मी तुम्ही मला भेट दिलेल्या साधनेविषयीच्या ग्रंथांचे वाचन करत आहे, तसेच मी सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र घरात लावले आहे.’’ त्यांनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप चालू केला असून ते घरातही ध्वनीमुद्रित केलेला नामजप लावतात. आम्ही त्यांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने प्रकाशित लेख आणि चलत्चित्रे पाठवतो. त्यांना ते सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायची पुष्कळ इच्छा आहे.

२. दिग्दर्शक

या दिग्दर्शकांनी ‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना’ या विषयावरचा लेख मागून घेतला आहे. त्यांनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप चालू केला आहे. त्यांना रामनाथी आश्रमात येण्याची तीव्र इच्छा असून त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ आदर आहे.

३. संहितालेखिका

या संहितालेखिकेने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप अन् नामजपादी उपाय चालू केले आहेत. त्यांना साधनेचे सर्व टप्पे जाणून घेण्याची आणि ते कृतीत आणण्याची उत्सुकता आहे. त्यांची सत्सेवा करायची सिद्धता आहे. त्या त्यांना सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे स्वीकारण्याच्या स्थितीत असतात.’

(‘छान !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

– श्री. शॉन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)