मंदिरे चालू करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन !
‘राज्यातील मंदिरे उघडावीत’, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर राज्यात ठिकठिकाणी ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले. यात भाजपच्या पदाधिकार्यांसह मंदिराचे पुजारी, तसेच भाविक आणि मंदिराच्या परिसरातील व्यावसायिक हेही सहभागी झाले होते.
मदिरालय चालू, मग मंदिर का बंद ? – भक्तांची सरकारला विचारणा
नाशिक – येथे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने येथील रामकुंड परिसरात शंखनाद आंदोलन केले. रामकुंड, पंचवटी येथे टाळ, घंटा आणि शंख वाजवून संत-महंत भाजप आणि भाविक यांनी ‘मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे’, अशा घोषणा देऊन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. ‘महाराष्ट्रात मदिरालय चालू असतांना मंदिरे का बंद ठेवण्यात येत आहेत?’, असा प्रश्न संतप्त आंदोलकांनी सरकारला विचारला.
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले म्हणाले की,
१. हे आंदोलन म्हणजे सरकारने पुढील पावले उचलली नाहीत, तर त्याला दिलेली एक चेतावणीच आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील मंदिरे राज्य सरकारने बंद केली आहेत. मधल्या काळामध्ये ही मंदिरे उघडली गेली; परंतु नंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सरकारने ५ मासांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद केली आहेत.
२. आता सर्व व्यवहार सुरळीत केले असतांना केवळ मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. या सर्व गोष्टींवर सरकारने मंदिरे उघडावीत, हा एकमेव पर्याय आहे.
पनवेल येथेही आरती करून विरूपाक्ष देवाला साकडे !
पनवेल – येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विरूपाक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी आरती करून देवाला साकडे घालण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण संख्या अल्प झाली असून जनजीवन पूर्ववत् होत असतांना सरकारने मांस आणि मदिरा सर्वकाही चालू केले; परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे. लोकांच्या भावनांचा विचार न करता ‘हम करो सो कायदा’ याप्रमाणे राज्यातील सरकार कारभार करत असून सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे भाविकांसाठी खुली झालीच पाहिजेत.
कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी मंदिरासमोर आंदोलन !
कोल्हापूर, ३० ऑगस्ट – श्री महालक्ष्मी मंदिरासमोर ‘दारू नको भक्तीचे दार उघड’, ‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, ‘उघडले मॉल्स, उघडली मद्यालये मुख्यमंत्रीजी कधी उघडताय आमची देवालये ?’ या घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजप प्रवक्ते धनंजय महाडिक, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई उपस्थिती होते.
पंढरपूर (सोलापूर) येथे मंदिरात घुसवणारे आंदोलक कह्यात !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – सोलापूर जिल्हा भाजपच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ शंखनाद आंदोलन चालू असतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
सोलापूर येथील भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या कह्यात !
सोलापूर – बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केल्याने पोलिसांनी या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
सांगली येथे श्री गणपति मंदिरासमोर आंदोलन !
सांगली – भाजप आणि सांगली शहर आध्यात्मिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे श्री गणपति मंदिरासमोर केलेल्या आंदोलनात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, आमदार श्री. सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक शिंदे, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, ह.भ.प. अजयकुमार वाले, महिला आघाडीच्या अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या.
सातारा येथे टाळ, घंटा आणि शंख वाजवून आंदोलन !
सातारा – येथील शहराध्यक्ष विकास गोसावी आणि महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने आनंदवाडी दत्तमंदिरासमोर आणि श्री तुळजाभवानी मंदिरासमोर टाळ, घंटा आणि शंख वाजवून आंदोलन करण्यात आले.
या वेळी सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, तसेच विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, वैशाली टंगसाळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.