हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या अभियानाला कर्नाटकमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीकडून १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हे अभियान संपूर्ण कर्नाटकात राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच या अभियानाचा प्रसार विविध मार्गाने करण्यात आला.

१. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी शासनाला निवेदन सादर केले. कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, दक्षिण कन्नड, बेंगळुरूसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत १९ जिल्हाधिकारी, ३४ तहसीलदार, २३ पोलीस अधिकारी, काही महानगरपालिका आणि नगर परिषदा, १० क्षेत्रीय शिक्षणाधिकारी आणि ६४ शाळा-महाविद्यालये येथे निवेदन देण्यात आले.

२. समितीच्या वतीने राज्यातील शाळा-महाविद्यालये येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३८८ शाळा आणि ४२ महाविद्यालये येथे ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. याचा लाभ १ सहस्र ३०९ विद्यार्थ्यांनी घेतला.

३. सोशल मिडियाच्या माध्यमातून १ लाख ५१ सहस्र ३७१ जणांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीचे लिखाण पाठवून प्रसार करण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण

मैसुरू येथील पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यावर त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन पूर्णपणे वाचले. त्यावर ते म्हणाले, ‘‘निवेदन छान आहे आणि अशी जागृती करणे आवश्यक आहे. तुम्ही हे कार्य करत आहात. तुमचे अभिनंदन !’’ यानंतर त्यांनी लगेच आपल्या स्वीय सचिवांना बोलावून निवेदनानुसार तत्परतेने कृती करण्याचा आदेश दिला.