देशात भगवान श्रीरामाच्या नावावर ३ सहस्र ६२६, तर श्रीकृष्णाच्या नावावर ३ सहस्र ३०९ गावांची नावे !
‘देवाला रिटायर करा’ म्हणणार्यांची नावे कधी कुणी गावांना देतात का ? – संपादक
नवी देहली – देशात वर्ष २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भगवान श्रीराम यांच्या नावावर ३ सहस्र ६२६, तर भगवान श्रीकृष्णाच्या नावावर ३ सहस्र ३०९ गावे आहेत. तसेच श्री गणेशाच्या नावावर ४४६ आणि गुरुनानक यांच्या नावावर ३५ गावे आहेत. देशातील ६ लाख ७७ सहस्रांपेक्षा अधिक गावांच्या नावांचा अभ्यास करण्यात आल्यावर ही माहिती समोर आली.
१. देशात ४१ काशी आणि १७ प्रयागराज नाव असलेली गावे आहेत.
२. बांगलादेशची राजधानी ‘ढाका’ नावाची भारतात २८ गावे असून ‘नेपाळ’च्या नावावर ४० गावे आहेत.
३. देशातील १८७ गावांची नावे ‘भरत’च्या नावावर आहेत, तर १६० गावांची नावे ‘लक्ष्मण’च्या नावावर आहेत. ‘सीता’ नावाची ७५ गावे असून ‘हनुमाना’ची नावे ३६७ गावांना आहेत. रावणाच्या नावावरही ६ गावे आहेत; मात्र रावणाचा भाऊ विभीषणाच्या नावावर कोणतेच गाव नाही.
४. देशात कुरुक्षेत्र नावावर कोणतेच गाव नाही. धर्मराज युधिष्ठिराच्या नावावर २ गावे आहेत, तर भीमाच्या नावाची ३८५, अर्जुन २५९, धृतराष्ट्र ८, कंस याची ४२ गावांना नावे आहेत. ओडिशातील केवळ एका गावाचे नाव भीष्म पितामहांच्या नावावर आहे.
५. म. गांधी यांच्या नावावर देशात ११७ गावे आहेत, तर नेहरू यांच्या नावावर ७२ गावे आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावावर वर्ष २०११ पर्यंत एकाही गावाचे नाव नव्हते. इंदिरा गांधी ३६, राजीव गांधी १९ आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाव २७ गावांना आहे.
६. मोगल बादशहा अकबर याच्या नावावर २३४, बाबर ६२, हुमायूं ३०, शाहजहां ५१ आणि औरंगजेब याच्या नावावर ८ गावे असून ही सगळी गावे उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात आहेत. (भाजपच्या राज्यात असलेली ही नावे तातडीने पालटून मोगलांची गुलामगिरी संपवणे आवश्यक ! – संपादक)