मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !
भाविकांचा तीव्र विरोध !
|
मल्लपूरम् (तमिळनाडू) – तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे. या शौचालयांमुळे मंदिराशेजारी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार आहे. या माध्यमातून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने भाविकांनी शौचालये बांधण्यास विरोध दर्शवला आहे. या ठिकाणच्या पंचायतीने मंदिरात येणार्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिराशेजारी ६ शौचालये बांधण्यासाठी ५ लाख रुपये मूल्याच्या निविदा मागवल्या आहेत. ‘हिंदु रिलीजिअस अँड चेरिटेबल एन्डोव्हमेंट’ (हिंदु धर्मादाय विभाग) खात्याने मंदिरापासून दूर अशा जागेत ही शौचालये न उभारता मंदिराच्या अगदी शेजारी त्यांचे बांधकाम चालू केले आहे. सरकारच्या या कृतीला स्थानिक लोक आणि भाविक यांनी विरोध करत ही शौचालये मंदिरापासूून दूर बांधण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
१. मंदिराच्या अगदी शेजारी शौचालये बांधल्याने तेथून येणार्या दुर्गंधीमुळे मंदिराच्या परिसरातील पावित्र्य नष्ट होईल, तसेच मंदिराच्या शेजारी असलेल्या विहिरीचे पवित्र पाणी प्रदूषित होईल, असे भाविकांचे म्हणणे आहे. या बांधकामासाठी मंदिराच्या परिसरातील अनेक वृक्ष तोडण्यात आली आहेत. यालाही भाविकांनी विरोध केला आहे.
२. शौचालये बांधण्यास आक्षेप घेत स्थानिक लोक आणि इतर हिंदु भाविक यांनी चेंगलपट्टू जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांकडे एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ‘‘जिल्हाधिकार्यांनी व्यक्तीशः या जागेला भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर, प्राचीन विहीर आणि पिण्याच्या पाण्याची टाकी यांपासून दूर अशा ठिकाणी ही शौचालये बांधावीत. जिल्हा प्रशासन त्वरित ही सुधारणा करून या प्राचीन मंदिराचे पावित्र्य राखील, तसेच मंदिराच्या आसपासचा निसर्ग पुनर्स्थापित करील, अशी आम्हाला आशा आहे.’’
३. मल्लपूरम् शहराच्या मध्यभागी श्रीथलसायाना पेरूमल हे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी अर्जुनाने तप केले होते. वैष्णव पंथानुसार वर्णन करण्यात आलेल्या १०८ दिव्य देसम् (पवित्र स्थाने) पैकी हे मंदिर ६३ वे दिव्य देसम् आहे.
४. वैष्णव पंथानुसार भगवान श्रीविष्णूची भक्ती करणार्या संतांनी ही दिव्य देसम् सांगितली आहेत. या लोकांना ‘अझवार’ अशी उपाधी आहे. अशा १२ ‘अझवार’नी (संतांनी) भगवान श्रीविष्णूची १०८ दिव्य देसम् सांगितली आहेत. यांपैकी मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिर हे अत्यंत पवित्र असे तीर्थस्थळ मानले जाते. या ठिकाणी केवळ तमिळनाडूमधील नव्हे, तर भारतभरातील हिंदु भाविक दर्शनासाठी येत असतात.