लसीचे दोन्ही डोस घेतले, तरी डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क घालणे आवश्यकच ! – वैद्यकीय तज्ञांचे मत

नवी देहली – कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क घालणे अनिवार्यच आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

१. संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. विश्‍वास मोंडे यांनी म्हटले की, ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे. आता लसीकरणाचा जो वेग आहे, तो पहाता हे उद्दिष्ट गाठणे अवघड दिसते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद व्हायला हवी. लस घेतल्यानंतर प्रत्येकाच्या शरिरामध्ये प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) किती संख्येने निर्माण होतील, हे वैद्यकीय चाचणी केल्याविना सांगता येणार नाही. लोकसंख्येचा असा मोठा अभ्यासही सध्या झालेला नाही. कोरोना प्रतिबंधासाठी ज्या डॉक्टरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले होते, त्यांनीही मास्कचा वापर सातत्याने चालू ठेवला आहे.

२. संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. आर्.एम्. नायर यांनी म्हटले की, कोरोना झाल्यानंतरचा शारीरिक, मानसिक तसेच इतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचा त्रास सहन करण्यापेक्षा लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होणे केव्हाही आरोग्यदायी आहे. लसीकरणानंतर संसर्ग होण्याची शक्यता न्यून होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर होणारी अन्य स्वरूपाची गुंतागुंत टळते. लसीकरणानंतरही सौम्य स्वरूपाचा त्रास झालेल्या व्यक्तींच्या संसर्गाचा त्रास लस न घेतलेल्या इतर व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो.