६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली, ठाणे येथील चि. हिंदवी प्रसाद वडके (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. हिंदवी प्रसाद वडके एक आहे !
आज गोपाळकाला (३१.८.२०२१) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. हिंदवी प्रसाद वडके हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
चि. हिंदवी प्रसाद वडके हिला तिसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. बाळ होण्यासाठी मी आणि पत्नीने केलेला भावप्रयोग !
१ अ. श्रीविष्णूच्या हृदयातून एक पांढरा चैतन्यकण बाहेर येऊन त्याने श्रीविष्णूच्या चरणी क्षणभर थांबून कृतज्ञता व्यक्त करणे आणि नंतर पृथ्वीच्या दिशेने जाणे, त्या वेळी श्रीलक्ष्मी अन् ब्रह्मदेव यांनी प्रसन्नपणे हसणे : ‘विष्णुलोकात श्रीविष्णु शेषनागावर पहुडले असतांना अकस्मात् त्यांनी स्मितहास्य केले आणि श्रीविष्णूच्या हृदयातून चैतन्याचा एक पांढरा कण बाहेर आला आणि तो क्षणभर श्रीविष्णूच्या चरणांपाशी थांबला. जणू तो चैतन्यकण कृतज्ञता व्यक्त करत होता. नंतर तो चैतन्यकण पृथ्वीच्या दिशेने जाऊ लागला. श्रीविष्णूच्या नाभीतून उमललेल्या कमलपुष्पात बसलेले ब्रह्मदेव आणि चरणांपाशी बसलेली श्री लक्ष्मीदेवी यांनी प्रसन्न हास्य केले. त्या चैतन्यकणाचे पृथ्वीवरील गुरुसेवेचे नियोजन आधीच झाले आहे. जणू श्रीविष्णूने त्यांच्या एका अंशरूपाला त्यांच्याच कलियुगातील श्रीजयंतावतारात एकरूप होण्यासाठी पाठवले.
१ आ. श्रीविष्णूकडून आलेला चैतन्यकण उभयतांसमोर येणे, तेव्हा त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून श्रीविष्णु आणि गुरुमाऊली यांच्या चरणी कृतज्ञताभावाने उभयतांचा उद्धार होण्यासाठी प्रार्थना करणे : त्या चैतन्यकणाच्या भोवती साक्षात् श्रीविष्णूचे वलय आहे. तो चैतन्यकण आमच्या समोर आल्यावर मी अन् पत्नी हात जोडून त्या चैतन्यकणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आम्ही श्रीविष्णु आणि प.पू. गुरुमाऊली यांना कृतज्ञतेने प्रार्थना करत आहोत, ‘तुम्ही पाठवलेल्या या जिवाचे काही प्रारब्ध शेष असेल किंवा आमच्याशी देवाण-घेवाण हिशोब शेष असेल, तर ते सर्व लवकरात लवकर संपू दे. तुम्ही आम्हा सगळ्यांना तुमच्या कोमल चरणी स्थान द्या. ‘आम्हा उभयतांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही या जिवाला पाठवले असून हे तुमचेच लेकरू आहे’, याची आम्हाला प्रत्येक क्षणी जाणीव असू दे. गुरुदेवा, या अविस्मरणीय भेटीसाठी आम्ही आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.’
१ इ. चैतन्यकणाने पत्नीच्या उदरात प्रवेश केल्यामुळे पत्नीचे उदर प्रकाशमान होणे आणि उभयतांवरील आवरण दूर होणे : प्रार्थना केल्यावर तो चैतन्यकण बीजरूपात पत्नीच्या उदरामध्ये गेला. त्यामुळे तिचे उदर चैतन्याने प्रकाशमान झाले आहे. तिच्या उदरातील चैतन्यरूपी जिवामुळे आमच्यावरील त्रासदायक आवरण दूर होत आहे. आमची गुरुमाऊलीवरील श्रद्धा अन् भाव वृद्धींगत झाला आहे.
‘हे गुरुदेवा, आम्हाला याच शरणागत आणि कृतज्ञता भावात रहाता येऊ दे. त्या जिवाचा सांभाळ आपणच आमच्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
१ ई. प.पू. गगनगिरी महाराज यांचा प्रसाद मिळणे
१ ई १. गगनबावडा येथे दर्शनाला गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांची तीव्रतेने आठवण येणे : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगड किल्ल्यावर प.पू. गगनगिरी महाराज यांचे तपःस्थान आहे. तेथे त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. तेथील शांत, आध्यात्मिक वातावरण आणि प.पू. गगनगिरी महाराज यांचे ध्यानस्थ बसण्याचे स्थान पहात असतांना मला प.पू. गुरुदेवांची तीव्रतेने आठवण येत होती. ‘गुरुदेव इथेही आहेत’, असे मला वाटत होते.
१ ई २. प.पू. गगनगिरी महाराज यांच्या तपःस्थानी दर्शनाला जाणे, तेथे अर्पण देतांना पावतीवर अगदी अकस्मात्पणे ‘हिंदवी प्रसाद वडके’, असे नाव लिहिण्यास सांगणे, तेथील पुजार्यांना ते नाव आवडणे आणि त्यांनी पत्नीला दोन वेळा प्रसाद देणे : महाप्रसाद घेऊन झाल्यावर आम्ही अर्पण देण्यासाठी एका पुजार्यांकडे गेलो. ते पुजारी प.पू. गगनगिरी महाराज यांच्यासारखेच दिसत होते. अर्पणाची पावती करतांना त्यांनी ‘नाव काय लिहायचे ?’, असे मला विचारले. तेव्हा अकस्मात्पणे ‘हिंदवी प्रसाद वडके’, असे नाव माझ्याकडून सांगितले गेले. अनपेक्षितपणे आणि उत्स्फूर्तपणे माझ्याकडून ते नाव सांगितले गेले. तेव्हा त्यांनीही ‘अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदवी’, असे बोलून त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. त्यांनी पत्नीला २ वेळा प्रसाद दिला. तेव्हा त्यांच्या कृतीमागील हेतू आम्हाला कळला नाही. नंतर पत्नी गरोदर राहिल्याचे समजले. तेव्हा ‘तो दुसर्यांदा दिलेला प्रसाद जन्माला येणार्या जिवासाठी दिला’, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त झाली.
– श्री प्रसाद वडके (वडील), डोंबिवली, ठाणे.
१ उ. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन : ‘आम्ही कोल्हापूरला जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले आणि तिला ‘माझ्या पोटी तुझाच अंश जन्माला येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्याच मासात मी गरोदर असल्याचे समजले.’ – सौ. स्नेहल वडके (आई), डोंबिवली, ठाणे.
२. गरोदरपण
२ अ. ‘गरोदरपणात मी नियमित नामजप करत असे. मी रामरक्षा म्हणत असतांना गर्भातील बाळ हालचाल करून प्रतिसाद द्यायचे. मी ‘पोटावर हात ठेवून प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने म्हणत असतांना बाळ आनंदाने पोटात भजने म्हणत आहे आणि नाचत आहे’, असे जाणवायचे.
२ आ. मी ‘प्रतिदिन त्रासदायक आवरण काढणे, गर्भातील बाळाभोवती संरक्षककवच निर्माण करणे, पोटाला विभूती लावणे, ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ वाचणे आणि तो उशाशी ठेवणे’, असे उपाय करायचे. बाळाविषयी विविध भावप्रयोग करायचे. मी ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचेही वाचन केले.
‘नियमित होत असलेले नामजपादी उपाय यांमुळे गर्भामध्ये बाळ पुष्कळ आनंदात आहे’, असे मला सतत जाणवायचे.
३. ‘बाळाचा जन्म श्रीकृष्णाच्या आवडत्या दिवशी व्हावा’, अशी माझी इच्छा होती. त्याप्रमाणे बाळाचा जन्म गोपाळकाल्याला झाला. त्यामुळे मला फार आनंद झाला.
– सौ. स्नेहल वडके
४. वय १ ते २ वर्षे
४ अ. निर्भय : ‘हिंदवी कुत्रा, मांजर अशा कुठल्याही प्राण्याला न घाबरता सहज गोंजारते. ती आगाशीत खेळत असतांना एक फुलपाखरू बर्याच वेळा तिच्याभोवती बागडते. त्याचप्रमाणे चिमण्या किंवा कबुतरे त्यांना खायला काही ठेवले नसतांनाही आगाशीत येऊन फिरतात आणि हिंदवी त्यांच्याशी बोलते.
४ आ. व्यायाम करणे : हिंदवी शारीरिकदृष्ट्या बारीक असूनही लवचिक आहे. ती तिच्या बाबांचे बघून सूर्यनमस्कार घालते.
४ इ. प्रेमळ
१. तिच्या आवाजात प्रेमभाव जाणवतो. ती कुणालाही हाक मारतांना प्रेमाने हाक मारते.
२. ती तुळशीला पाणी घालून तिला नमस्कार करते आणि तिच्या मंजिरीचा सुगंध घेते. त्याच समवेत ती इतर झाडांनाही पाणी घालते. त्यांना कुरवाळते आणि त्यांच्याकडे पाहून हसते.
४ ई. आध्यात्मिक ओढ
४ ई १. मुद्रा करणे : ती खेळतांना, गाणी ऐकतांना किंवा झोपलेली असतांना बहुतांश वेळी तिची तर्जनी आणि अंगठा अशी मुद्रा असते.
४ ई २. ‘संत’ शब्दाविषयी जाणीव : एकदा ती झोपली असतांना मी ‘तुला पुष्कळ साधना करून संत व्हायचे आहे’, असे बोललो होतो. दुसर्या दिवशी मी सहज हिंदवीला विचारले, ‘‘मोठी झाल्यावर तू कोण होणार ?’’ तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तिने ‘‘संत’’, असे उत्तर दिले. तेव्हा ‘देव प्रत्येक गोष्ट तिच्या मनावर कशी बिंबवत आहे’, हे लक्षात येऊन गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
४ ई ३. देवद आश्रमात असतांना हिंदवीची जाणवलेली आध्यात्मिक स्थिती !
अ. हिंदवी एक वर्षाची असतांना आम्ही देवद आश्रमात गेलो होतो. आश्रमात प्रवेश केल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहिल्यावर तिने तर्जनी आणि अंगठा अशी मुद्रा केली.
आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत ती बराच वेळ होती. तेथून तिला बाहेरच यायचे नव्हते.
इ. आश्रमात असतांना ती अधिक आनंदात होती.’
– श्री. प्रसाद वडके (वडील), डोंबिवली, ठाणे.
४ उ. भाव
४ उ १. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी तिची पापी घेतल्यावर स्वतःच्या गालावरून हळूवारपणे हात फिरवणे, जणू ‘ती तिला मिळालेली अनमोल भेट असून ती त्या भेटीला कुरवाळत आहे’, असे वाटणे : एकदा एका सत्संगात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांची भेट झाली. एरव्ही इतर कुणी तिच्या गालाला हात लावला किंवा पापी घेतली, तर तिला आवडत नाही; परंतु सद्गुरु अनुताईंनी तिची पापी घेतली, तेव्हा घरी येईपर्यंत ती मधे मधे गालावरून हळूवार हात फिरवत होती. ते पाहून ‘सद्गुरु अनुताईंनी तिची घेतलेली पापी, म्हणजे तिला मिळालेली अनमोल भेट असून ती त्या भेटीला ती कुरवाळत आहे आणि सद्गुरु अनुताईंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे वाटले.
४ ऊ. अनुसंधान
१. ‘तुला कुणी मारले, तर कृष्णाला सांगायचे’, असे मी तिला सांगितले होते. तेव्हापासून तिला त्रास झाल्यावर ती ‘कृष्ण’, असे म्हणते.
२. ‘कृष्ण कुठे आहे ?’, असे तिला विचारल्यावर ती आजूबाजूला बघते आणि एका ठिकाणी हात दाखवून ‘तिथे’, असे सांगते.
३. कधी कधी ती एकटक श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून बोलते आणि हसते. तेव्हा ‘कृष्ण आणि ती खेळत आहेत’, असे वाटते.
५. अनुभूती
५ अ. यजमानांना त्रास होत असतांना हिंदवीने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवणे किंवा त्यांच्या छातीवर हात ठेवणे, त्यामुळे त्यांचा त्रास न्यून होऊन नामजप चालू होणे : यजमानांना आध्यात्मिक त्रास होत असतांना हिंदवी स्वतःहून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यांच्या छातीवर हात ठेवते. त्यानंतर त्यांचा त्रास न्यून होऊन त्यांचा नामजप चालू होतो. ती असे करत असतांना मला सुगंधाची अनुभूतीही आली.
५ आ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या केवळ स्पर्शाने हिंदवीचा कफ पडून तिचा त्रास न्यून होणे : ‘हिंदवी वर्षाची असतांना एकदा मी हिंदवीला घेऊन सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा ती रुग्णाईत होती. तिला कफाचा त्रास होत होता. सद्गुरु अनुताई यांच्याशी भेट झाल्यावर सद्गुरु अनुताईंनी त्यांचे दोन्ही हात तिच्या गालांवर फिरवून तिला जवळ घेतले. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. सद्गुरु अनुताई निघून गेल्यावर हिंदवीला जोरात उलटी झाली आणि प्रचंड प्रमाणात कफ पडला. त्या दिवसापासून तिचा कफाचा त्रास न्यून झाल्याचे जाणवले. तेव्हा मला ‘सद्गुरु अनुताई आणि गुरुमाऊली तिची किती काळजी घेत आहेत’, असे जाणवून त्यांच्याप्रती फार कृतज्ञता वाटली. तेव्हा ‘संतांच्या सहज स्पर्शात किती सामर्थ्य असते’, याची मला अनुभूती आली.
५ इ. स्वामी समर्थांनी भेटून हिंदवीचे कौतुक केल्याचे जाणवणे
५ इ १. नातेवाइकांकडे जातांना एका सात्त्विक दिसणार्या वृद्ध व्यक्तीने ‘ही मुलगी साधना करून अध्यात्मात पुष्कळ प्रगती करील’, असे सांगणे : एकदा आम्ही एका नातेवाइकांकडे जातांना वाटेत एक वृद्ध गृहस्थ स्वतःहून आमच्याजवळ आले. ते गृहस्थ उंच होते, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती आणि कपाळावर गंध होते. त्यांचा तोंडवळा पुष्कळ सात्त्विक होता. त्यांनी हिंदवीची विचारपूस केली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर भविष्यवाणी सांगावी, तसे ते सांगू लागले, ‘‘ही मुलगी अतिशय सात्त्विक आहे. ही देवाची पुष्कळ भक्ती करील. ती तुमचेही प्रारब्ध संपवील. सध्याची तिची आध्यात्मिक स्थिती तुम्ही ओळखू शकत नाही. अध्यात्मात ती अजूनही फार पुढे जाईल.’’ असे सांगून ते निघूनही गेले.
५ इ २. जवळच स्वामी समर्थांचा मठ असणे, तेव्हा ‘प्रत्यक्ष स्वामी समर्थच आले होते’, असे वाटणे : हे सगळे फार अकस्मात् झाले. ते गृहस्थ बोलत असतांना हिंदवी शांतपणे त्यांच्या तोंडवळ्याकडे पहात होती आणि मध्येच हलकीशी हसत होती. ते निघून गेल्यावर आम्ही सभोवती बघितले. तेव्हा तेथे स्वामी समर्थांचा मठ होता. ‘ते वृद्ध गृहस्थ, म्हणजे साक्षात् स्वामी समर्थच होते’, असा विचार मनात येऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता दाटून आली.’
– सौ. स्नेहल वडके
६. कृतज्ञता
‘घरातील व्यक्ती साधक नसल्याने आणि वातावरण पुष्कळ नकारात्मक असल्याने साधनेत असंख्य अडथळे येत होते; परंतु हिंदवी आल्याने वास्तूतही पालट जाणवायला लागला आहे. हिंदवी म्हणजे घरातील चैतन्य आहे. तिच्यामुळे घरात सात्त्विकता पसरते. ‘हिंदवीच्या सहवासात रहाता येणे, म्हणजे गुरुदेवांच्या सहवासात रहायचे भाग्य आहे’, असा विचार येऊन गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते. ‘गुरुदेव, आपणच आमच्याकडून या जिवाचे संगोपन आणि पालनपोषण करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. स्नेहल वडके आणि श्री. प्रसाद वडके, डोंबिवली, जिल्हा ठाणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |