(म्हणे) ‘आम्ही सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्तरांवर भारतासमवेत काम करण्यास उत्सुक’ ! – तालिबानचा साळसूदपणा

भारत आतंकवाद्यांशी कोणतेही संबंध ठेवत नाही, असे भारताने तालिबानला ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक

तालिबानचा नेता शेर महंमद अब्बास स्टानेकझाई

काबुल (अफगाणिस्तान) – भारतीय उपखंडासाठी भारत पुष्कळ महत्त्वाचा देश आहे. आम्हाला पूर्वीप्रमाणे भारतासमवेत आमचे सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध चालू ठेवायचे आहेत. आम्ही भारतासमवेतच्या आमच्या राजकीय, आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना योग्य महत्त्व देतो आणि हे संबंध कायम रहावेत, अशी आमची इच्छा आहे. आम्ही या संदर्भात भारतासमवेत काम करण्यास उत्सुक आहोत, असे विधान तालिबानकडूनच प्रथमच करण्यात आले आहे. तालिबानचा नेता शेर महंमद अब्बास स्टानेकझाई याने हे विधान केले आहे. अफगाण सैन्याच्या ‘कॅडेट्स’साठी (सैनिकांसाठी) प्रशिक्षणाचा भाग म्हणून १९८० च्या दशकात स्टानेकझाई डेहराडूनच्या ‘इंडियन मिलिटरी अकादमी’मध्ये आला होता. वर्ष १९९६ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यावर तो काळजीवाहू उप परराष्ट्रमंत्री होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमावादात आम्ही पडणार नाही !

भारत आणि पाकिस्तान यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यांच्या वादात अफगाणिस्तान पडणार नाही, असे स्टानेकझाई याने स्पष्ट केले. ‘ते अंतर्गत लढ्यात अफगाणिस्तानचा वापर करणार नाहीत. ते त्यांच्या सीमेवर लढू शकतात. आम्ही कोणत्याही देशाला आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही’, असेही स्टानेकझाई याने स्पष्ट केले.