परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावानुसंधानात रहाणारे आणि मिरज येथील साधकांचा आधार बनलेले सनातनचे संत पू. जयराम जोशीआबा (वय ८३ वर्षे) !

मिरज येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) यांच्याविषयी त्यांची सून सौ. भाग्यश्री जोशी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.  

(भाग १)

पू. जयराम जोशीआजोबा

१. बालकभाव

‘एकदा पू. (सौ.) अश्विनी पवार मिरज आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पू. आबांकडे पाहून सांगितले, ‘‘हा  त्यांचा बालकभाव आहे.’’ मलाही त्यांची सेवा करतांना ‘ते माझे लहान बाळ आहेत’, असे जाणवते. ते इतके गोड हसतात की, आपल्याला आलेला थकवा दूर होतो आणि मनातील प्रतिक्रिया नष्ट होतात.

१ अ. तळलेले पदार्थ आवडणे आणि ‘ते अधिक हवे’, असे वाटून ऐश्वर्याच्या पानातून (ताटातून) ते पदार्थ हळूच पळवणे : ‘पू. आबांचे वागणे लहान मुलांसारखे असते. त्यांना श्रीखंडाच्या गोळ्या, तळलेले पापड असे पदार्थ फार आवडतात आणि त्यांना लहान मुलांप्रमाणेच ‘ते पदार्थ अधिक मिळावेत’, असेही वाटते. त्यामुळे त्यांच्या पानातील (ताटातील) तळलेले पदार्थ संपल्यावर पू. आबा कु. ऐश्वर्याच्या (नातीच्या) पानातील (ताटातील) ते पदार्थ गंमत म्हणून गुपचूप पळवतात.

१ आ. ऐश्वर्याच्या बाहुलीशी एखाद्या लहान बाळाप्रमाणे वागणे 

१ आ १. ऐश्वर्याच्या बाहुलीला प्रेमाने गोंजारणे आणि बोलणे : पू. आबा ऐश्वर्याकडे असलेल्या लहान बाहुलीला गोंजारतात. रात्री झोपतांनाही ते बाहुलीला ‘सोनल, दमलीस का ? आता शांत झोप’, असे म्हणून ऐश्वर्याला पांघरूण घालतात, तसे त्या बाहुलीलाही पांघरूण घालतात आणि सकाळी ‘झोप झाली का ? आता उठा ! सेवा करायची आहे ना ?’, असे बाहुलीला म्हणतात. ते बाहुलीच्या तोंडवळ्यावरून हात फिरवतात आणि तिची पापीही घेतात.

१ आ २. ‘पू. आबांच्या बोलण्याला निर्जीव बाहुली प्रतिसाद देत आहे’, असे जाणवणे : पू. आबा त्या बाहुलीशी एखाद्या लहान बाळाशी बोलल्याप्रमाणे बोलतात. त्यांचे बोलणे ऐकून ‘ती बाहुली त्यांना प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवते. त्या वेळी त्या बाहुलीच्या डोळ्यांतही पालट होतो आणि तिच्यात भाव जाणवतो. त्या बाहुलीमध्येही जिवंतपणा आला आहे. तिचे हात-पाय आणि तोंडवळा यांवर चकाकी आली आहे.

१ आ ३. एका छोट्या बाळाला दोन दिवस बाहुली खेळण्यासाठी देणे, बाळ परत गेल्यावर बाहुलीच्या तोंडवळ्यावर पू. आबांपासून दूर गेल्याचे दुःख जाणवणे, पू. आबांनी तिला जवळ घेऊन गोंजारल्यावर आणि तिच्याशी प्रेमाने बोलल्यानंतर तिचे मुखही आनंदी दिसणे : फेब्रुवारी २०२१ मध्ये मिरज आश्रमात एक लहान बाळ आले होते. त्या बाळाला खेळण्यासाठी २ दिवस ती बाहुली दिली होती. तेव्हा पू. आबा बाहुलीची आठवण काढत होते. त्या वेळी ‘बाहुलीचा तोंडवळा आणि डोळे यांतूनही तिला पू. आबांपासून दूर गेल्याचे दुःख झाले आहे’, असे जाणवत होते. लहान बाळ आपल्या आईपासून दूर गेल्यावर हिरमुसते, तसे तिचे मुख झाले होते. ती बाहुली परत आल्यावर पू. आबांनी तिला गोंजारले. ते तिला म्हणाले, ‘कुठे गेली होतीस ? आता इथेच थांब.’ त्यानंतर ५ मिनिटांतच बाहुलीच्या तोंडवळ्यात पालट होऊन ती आनंदी दिसू लागली. ‘पू. आबांच्या प्रेमामुळे बाहुलीतही पालट झाला, तसा माझाही प्रेमभाव वाढवायला हवा’, याची मला जाणीव झाली.

सौ. भाग्यश्री जोशी

२. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाची तीव्र ओढ

‘कोरोना महामारीच्या काळात दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई होत नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटायचे. त्यांना प्रतिदिन सकाळी उठल्यावर आधी दैनिक वाचण्याची ओढ असते; पण भ्रमणभाषवर दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यांना ते समाधान मिळत नव्हते. या काळात एकदा रामनाथीहून त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे ४ – ५ अंक पाठवले होते. तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी ती दैनिके एक मास प्रतिदिन दिवसातून ५ – ६ वेळा वाचली. तेव्हा पुनःपुन्हा तेच तेच वाचूनही त्यांना तोच आनंद मिळत होता.

३. पू. आबांची सेवा केल्यामुळे झालेले लाभ !

३ अ. आरंभी पू. आबांची सेवा करतांना राग येणे; मात्र आता त्यातून ‘ते माझे प्रारब्ध नष्ट करत आहेत’, असे जाणवून सेवा अधिक भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : याआधी त्यांची सेवा करतांना माझी चिडचिड होऊन मला त्यांचा राग यायचा आणि ते रागावल्यावर मला वाईटही वाटायचे. त्यानंतर ‘सेवेत माझ्याकडून चुका झाल्यावर ते मला रागावतात; पण नंतर प्रेमाने समजावूनही सांगतात आणि माझ्यावर तेवढेच प्रेमही करतात’, हे माझ्या लक्षात आले. आता ‘माझ्याकडून चूक झाली, तरी देव माझे प्रारब्ध नष्ट करत आहे’, याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटते. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) संकल्पामुळे आता माझ्याकडून त्यांची सेवा भावपूर्ण आणि त्रुटींविरहित होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत.

३ आ. पूर्वी पू. आबांची सेवा करतांना थकवा येणे, आता ‘सेवा करण्यासाठी देव बळ देतो’, असे जाणवून स्वतःचे आध्यात्मिक त्रासही न्यून होणे : या आधी पू. आबांची सेवा करतांना माझा थकवा वाढायचा. त्यामुळे माझ्या मनात ‘मला जमत नाही’, असा नकारात्मक विचारही यायचा. आता मला वाटते, ‘माझी क्षमता नाही’, हे देवाला ठाऊक आहे. त्यांची सेवा करण्यासाठी तोच मला शक्ती देणार आहे. ‘तोच मला बळ पुरवून माझ्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे’, असे मला जाणवते. पू. आबांच्या सेवेमुळे माझा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन माझ्यात पालट होत आहे.

३ इ. पू. आबा साधिकेचे त्रास भोगत असल्यामुळे तिला होणारा त्रास अल्प प्रमाणात होणे : पू. आबांना चक्कर येते किंवा थकवा वाढतो, तेव्हा मलाही थकवा येतो. मला जुलाब होत असतांना त्यांनाही जुलाब होऊ लागतात. त्यांचा कान दुखत असतांना माझाही कान दुखत होता. वैद्य आम्हा दोघांना देत असलेली काही औषधेही सारखीच असतात आणि आम्हाला येत असलेले नामजपादी उपायही सारखेच असतात. तेव्हा मला कु. राजश्री सखदेव यांच्या एका लेखाची आठवण झाली. कै. सद्गुरु (सौ.) सखदेवआजींना होत असलेले त्रास राजश्रीताईंनाही (मुलीलाही) व्हायचे. त्या वेळी त्यांची सद्गुरु आजींशी एकरूपता झाली होती. माझी एवढी पात्रता नाही; पण त्या वेळी ‘पू. बाबा माझे त्रास घेतात’, असे मला वाटते. त्यामुळे मला अल्प प्रमाणात त्रास होतो.

४. पू. आबांनी केलेल्या भावपूर्ण प्रार्थना आणि त्यांचे अस्तित्व यांमुळे साधकांना मिळत असलेला आधार !

पू. आबांशी बोलल्यावर विचार, निराशा, ताण, भीती, शंका, प्रश्न इत्यादी सर्व नष्ट होते आणि गुरुदेवांप्रती शरणागत अन् कृतज्ञता भाव वाढतो. कुठलीही अडचण असो, त्यांना सांगितल्यावर ती लगेच सुटते किंवा सुटणारच, याची मला आणि साधकांनाही निश्चिती असते.

४ अ. पू. आबांशी बोलल्यावर अडचणींतून मार्ग मिळणे : साधकांना एका सेवेत पुष्कळ अडचणी येत होत्या. ‘त्यांना कसे सामोरे जायचे ?’, असे त्यांना वाटत होते; पण पू. आबांशी बोलल्यावर त्यांना अडचणीतून मार्ग मिळत असे. त्यामुळे साधकांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसून ‘देव संतांच्या माध्यमातून भरभरून कृपा करत आहे’, असे मला जाणवले.

४ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधिकेशी प्रेमाने बोलून तिला मार्गदर्शन करणे : एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. तिचा भ्रमणभाष कितीही वेळा आला, तरी पू. आबा प्रत्येक वेळी तिच्याशी शांतपणे आणि प्रेमाने बोलतात. त्या साधिका म्हणतात, ‘‘केवळ पू. आबांनी दिलेल्या आधारामुळेच मी आज जिवंत आहे.’’

एकदा पू. आबांची परात्पर गुरुदेवांशी भेट झाली होती. त्या वेळी गुरुदेव म्हणाले होते, ‘‘सूर्य उगवल्यावर फुले उमलतात, पक्षी किलबिलाट करतात. सूर्याला त्यांना सांगावे लागत नाही, ‘मी आलो आहे, तुम्ही उमला किंवा उठा.’ तसेच संतांच्या अस्तित्वानेच सर्व होत असते. त्यांनी काही वेगळे न करता त्यांचे अस्तित्व कार्य करत असते.’’

४ इ. पू. आबांनी केलेल्या प्रार्थनेमुळे अडचण दूर होणे : एकदा एका वाहिनीवर सनातन संस्थेचा कार्यक्रम दाखवायचा होता; परंतु संबंधित व्यक्ती दूरभाषच उचलत नव्हती. तेव्हा साधकांनी पू. आबांना ही अडचण सांगितली. पू. आबांनी प्रार्थना केली. त्यानंतर त्या व्यक्तीने रात्री उशिरा निरोप पाहून लगेच कार्यक्रम दाखवत असल्याचा निरोप पाठवला आणि त्याची ‘पोस्ट’ही (कार्यक्रमाचे विज्ञापन करणारा संदेश) बनवून पाठवली.

कुठलेही आंदोलन असो किंवा साधकांना होणारे त्रास असोत, पू. आबा अतिशय मनापासून प्रार्थना करतात. त्यात त्यांची आर्तता आणि भोळा भाव असतो. ते म्हणतात, ‘गुरुदेवा, या साधकांचा माझ्यावर विश्वास आहे; पण मी काय करणार ? तुम्हीच सर्व करणार आहात. माझ्या हातात केवळ त्यांचा निरोप तुम्हाला पोचवणे एवढेच आहे.’

४ ई. ‘पू. आबांना अडचणी सांगितल्यावर त्यातून मार्ग निघतो’, अशी त्यांचा मुलगा योगेश यांना अनुभूती येणे : मिरज आश्रमातील अल्प साधकसंख्येमुळे श्री. योगेश यांना (यजमानांना (पू. आबा यांचा मुलगा)) आश्रमसेवेत कितीही अडचणी आल्या, तरी पू. आबांना अडचण सांगितल्यावर त्यांचा ताण जाऊन त्यावर उपाययोजना निघते. आमच्या सेवेत येणार्‍या सर्व अडचणी पू. आबांनी केलेल्या प्रार्थनेनेमुळे सुटतात. तेव्हा ‘शिक्षण आणि अनुभव यांपेक्षाही शरणागती अन् दृढ श्रद्धा आवश्यक आहे’, याची मला जाणीव झाली.

४ उ. ‘सुनेचा त्रास न्यून व्हावा’, यासाठी प्रार्थना करणारे पू. आबा ! : सेवेचा किंवा व्यष्टी साधनेचा आढावा असतांना माझा त्रास वाढतो. काही वेळाने तो न्यून होऊन मला आढावा देता येतो. तेव्हा ‘नक्की पू. आबांनी माझ्यासाठी प्रार्थना केली असणार. त्यामुळेच मला आढावा देता आला’, असे माझ्या लक्षात येते. खोलीत आल्यावर त्यांना त्याविषयी विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘तुला त्रास होत आहे’, असे मला समजले; म्हणून मी प्रार्थना केली.’’ तेव्हा ‘त्यांच्यामुळेच मी आढावा देऊ शकते आणि सेवा करू शकते’, याची मला जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली.

४ ऊ. सर्व कुटुंबियांचा आधारस्तंभ बनलेले पू. आबा ! : माझे सासर आणि माहेर येथील सर्वच कुटुंबीय पू. आबांना फार मान देतात. ते सर्व गोष्टी त्यांना विचारूनच करतात. त्यांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. प्रत्येकालाच ते साधनेसाठी साहाय्य करतात आणि ‘देवाला शरण जा. त्याला सर्व सांगा. त्याची आपल्यावर अखंड कृपा आहे’, असे सांगून त्यांची देवावरील श्रद्धा वाढवतात.

४ ए. ‘पू. आबांच्या केवळ अस्तित्वानेच घराचे रक्षण होते’, असे म्हणणारे आश्रमाच्या समोरील इमारतीतील लोक ! : पू. आबा एका खोलीत असले, तरी त्यांचे अस्तित्व आणि प्रार्थना यांमुळे सर्व साधक अन् समाजातील लोकांनाही आधार मिळतो. मिरज आश्रमासमोर असलेल्या इमारतीतील व्यक्तींनाही त्यांचा आधार वाटतो. त्यांनी सांगितले, ‘‘त्यांना पाहून ‘हे आमचे बाबा आहेत’, असे वाटते आणि त्यांच्यामुळे आमच्या घराचे रक्षण होते.’’ त्यांनाही ‘पू. आबा उच्च साधना असलेली व्यक्ती आहे’, असे लक्षात येते. ते त्यांना जातांना-येतांना सांगून जातात. ते भेटले नाहीत, तर हाक मारतात. पू. आबांनाही ते भेटले नाहीत, तर चुकल्यासारखे वाटते.

५. सूक्ष्मातील जाणणे

५ अ. ‘२ दिवसांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू संत होतील’, असे सांगणे आणि ते १०१ वे संत घोषित होणे : एकदा पू. आबा म्हणाले, ‘‘दोन दिवसांत गुरुदेवांचे भाऊ १०० वे संत होतील.’’ त्याच्या दुसर्‍या दिवशी श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी या १०० व्या संत घोषित झाल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला देवाने सांगितलेले चुकणार नाही. हे कसे चुकले ?’’ नंतर ते म्हणाले, ‘‘आता ते १०१ वे संत होतील.’’ त्याच दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत (भाऊकाका) आठवले हे १०१ वे संत घोषित झाले.

 ६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सतत असलेले अनुसंधान !

६ अ. एकदा पू. आबा दूरभाषला नमस्कार करतांना पाहून त्यांना त्याविषयी विचारल्यावर ‘मी परात्पर गुरुदेवांना नमस्कार करत आहे’, असे सांगणे आणि प्रत्येक वेळी दूरभाष हातात घेतल्यावर गुरुदेव भेटल्याचा आनंद त्यांच्या तोंडवळ्यावरून ओसंडून वहाणे : ‘प्रत्येक वेळी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पहातांना पू. आबांना मिळणारा आनंद सारखाच असतो किंबहुना तो अजून वाढताच असतो’, असे मला जाणवले. एक दिवस पू. आबा भ्रमणभाषला नमस्कार करत होते आणि हसत होते; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘भ्रमणभाषला नमस्कार का करत आहात ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अगं, भ्रमणभाषला नाही, तर भ्रमणभाषच्या पडद्यावरील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार करत आहे. गुरुदेवच माझे सर्वस्व आहेत. ते माझे प्राण आहेत.’’ हे म्हणतांना त्यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांत अश्रू येऊन कंठ दाटून आला होता. तेव्हा त्यांची भावावस्था आणि आनंद पाहून ‘तिथे प्रत्यक्ष गुरुदेवच आहेत आणि ते त्यांना पहात आहेत’, असे मला वाटले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्याकडून आर्ततेने प्रार्थना झाली, ‘गुरुराया, असा असीम भोळा भाव आमच्यातही वाढवा.’ प्रत्येक वेळी भ्रमणभाष हातात घेतल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरून गुरुदेवांना भेटल्याचा आनंद ओसंडून वहातो. नंतर ते शरण जाऊन डोके टेकवतात.

६ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ अनेक वेळा पहात रहाणे आणि त्यातच रमलेले असणे : दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’मधील छायाचित्रे पहाणे, या माध्यमातून ‘त्यांचे सतत अनुसंधान चालू आहे’, असे मला जाणवते. ते आमच्या समवेत असले, तरी काहीच बोलत नाहीत. चक्कर आणि थकवा यांमुळे त्यांना सतत झोपावे लागते. त्यामुळे ते सतत खोलीतच असतात; पण तरीही ते सतत आनंदी असतात. त्यांना ‘आपण कुठे जावे, काही खायला मिळावे, आम्ही काही करावे’, अशी कुठलीही अपेक्षा नसते. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही एकाच ठिकाणी राहूनही सतत आनंदी कसे रहाता ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझे गुरुदेव सतत माझ्या समवेत असतात. त्यांचे माझ्यावर फार प्रेम आहे. त्यांचे माझ्याकडे सतत लक्ष आहे.’’ त्यांची ही दृढ श्रद्धा पाहून ‘आपण किती छोट्या गोष्टींत अडकतो आणि अपेक्षा करतो अन् त्यामुळेच आपला आनंद गमावतो’, याची मला जाणीव झाली.

६ इ. पू. आबांनी पुष्कळ वेळा प्रसाद आल्याकारणाने गुरुदेवांना सूक्ष्मातून ‘आता प्रसाद नको’, असे म्हटल्यावर रामनाथीहून प्रसाद न येणे, नंतर प्रसाद न आल्याने पू. आबांना पुष्कळ खंत वाटणे आणि गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलल्यावर २ – ३ वेळा प्रसाद येणे : पू. आबांसाठी रामनाथीहून प्रसाद आल्यावर त्यांना फार आनंद होतो. ‘गुरुदेवांचे आपल्याकडे किती लक्ष आहे ?’, यासाठी ते सतत कृतज्ञता व्यक्त करतात. एकदा ते सूक्ष्मातून गुरुदेवांना म्हणाले, ‘गुरुदेवा, आता पुष्कळ खाऊ (प्रसाद) आला आहे. तुम्ही मला पुष्कळ दिले आहे. आता खाऊ नको. माझी अपेक्षा नाही.’ त्यानंतर खरोखरच त्या मासात त्यांना प्रसाद आला नाही. त्यानंतरही काही वेळेला प्रसाद आला नाही. तेव्हा त्यांना खंत वाटत होती. ते म्हणाले, ‘गुरुदेवा, माझे काही चुकले का ? मला खाऊ का येत नाही ?’ त्यानंतर त्यांना लागोपाठ २ – ३ वेळा खाऊ आला. एकदा रामनाथीहून एक साधक आले; पण ‘त्यांच्या समवेत प्रसाद आला नाही’, असे पू. आबांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘असे होणार नाही. तुम्ही निश्चिती करा.’’ पुन्हा पाहिल्यावर त्यांना प्रसाद आला होता. त्या वेळी माझी भावजागृती झाली. ‘त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे देव त्यांचे सर्व ऐकतो’, असे मला जाणवले.

६ ई. पू. आबांच्या मागील वाढदिवसाला त्यांनी स्वतःविषयीचे लिखाण छापून न येण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर सांगणे आणि तसे काहीही छापून न येणे : पू. आबांच्या वर्ष २०२० मधील वाढदिवसाला त्यांनी ‘या वेळी माझ्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये काही छापू नका’, असे परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर सांगितले. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही असे का सांगत आहात ?’’; परंतु त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि खरोखरच मागील वर्षी त्यांचे लिखाण छापून आले नाही. तेव्हा ‘त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट गुरुदेवांपर्यंत पोचते’, याची मला निश्चिती झाली.’

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– सौ. भाग्यश्री योगेश जोशी (सून), सनातन आश्रम, मिरज. (११.३.२०२१)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507320.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक