अपहार कि जनतेचा विश्वासघात ?

पुणे येथील सेवा विकास बँक

पुणे येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९ कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी अधिकोषाचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदार यांच्या विरोधात ११ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच पिंपरीतील मुख्य शाखेत आणि पिंपरी वाघेरे येथील शाखेत पैसे काढून घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात आता नव्याने ३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. उर्वरित प्रकरणांमध्ये आणखी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. ‘कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे. खरेतर प्रशासनाने गुन्हे नोंद करून संबंधितांना कठोर शिक्षा करण्यासह त्यांच्याकडून जनतेचे पैसे सव्याज वसूल करायला हवेत, तरच अशा प्रकरणांना आळा बसेल.

‘एखाद्या अधिकोषात अधिक दराने व्याज मिळते’, त्यामुळे जनता कोणताही विचार न करता अशा ठिकाणी पैसे ठेवते. खरेतर नागरिकांनीही आपण कष्ट करून कमावलेला पैसा ठेवतांना ‘व्याज किती मिळते ?’, याचा विचार दुय्यम ठेवून पैसे सुरक्षित रहातील, अशा ठिकाणी ठेवायला हवेत. असे असले तरी आजवरचा इतिहास पहाता कित्येक पतसंस्था, तसेच काही अधिकोष यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले आहेत. ज्यामुळे नागरिकांना मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

बँकांचे कर्जवाटपाचे धोरण, कर्जवाटपाची पद्धत, कर्जसंमतीचे उत्तरदायित्व, बँकांमध्ये केले जाणारे लेखापरीक्षण आणि ते करणार्‍या यंत्रणांचे अपयश या सर्वांचा विचार करून उपाययोजना काढल्यास परिस्थिती सुधारू शकते. सरकारने यामध्ये लक्ष घालून सर्व गोष्टींवर अकुंश ठेवायला हवा. खरेतर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर शिक्षा असलेल्या कायद्यांसमवेत व्यक्ती निःस्वार्थी बनवणेही आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण देऊन समाजाला साधना शिकवायला हवी, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे