नूल (जिल्हा कोल्हापूर) येथील मठाधिपती चंद्रशेखर महास्वामीजी यांचे महानिर्वाण
नूल (जिल्हा कोल्हापूर) – पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती ष.ब्र. (षट्स्थल ब्रहीभूत) १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी पहाटे महानिर्वाण झाले. महास्वामीजी सुरगीश्वर मठाचे १२ वे मठाधिपती म्हणून कार्यरत होते. गेली ४५ वर्षे त्यांनी वैदिक आणि लिंगायत समाजाची तत्त्वे यांचा प्रचार अन् प्रसार केला.
ष.ब्र. १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कार्याचा अल्प परिचय
१. महास्वामींचा जन्म कणगला (कर्नाटक) येथे ६ एप्रिल १९३८ या दिवशी आचारसंपन्न हिरेमठ कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लिंगय्या, तर आईचे नाव निलांबिका होते. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जगद्गुरु विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली काशी विद्यापिठातून धार्मिक शिक्षण घेतले. त्यांनी बेंगळुरूच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘साहित्य अलंकार’ ही पदवी, तर त्यानंतर त्यांनी ‘उपाचार्यरत्न’ ही पदवीही प्राप्त केली.
२. चंद्रशेखर महास्वामीजी यांनी गडहिंग्लज तालुका आणि कर्नाटक येथील अनेक मंदिरे अन् मठ बांधले. त्यांनी अनेक शिष्यांना गुरुकुल पद्धतीप्रमाणे वैदिक ज्ञान दिले. ‘इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘लक्ष्मी नागरी पतसंस्था’ यांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
३. नूलचे ग्रामदैवत असलेल्या मारुति मंदिराचा जिर्णोद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होता.