(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस
केवळ ब्राह्मण आहेत; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्र्य होय. थोर पुरुषांकडेही जातीच्या चष्म्यातून पाहून जात्यंधता पसरवणारे समाज एकसंध काय राखणार ? – संपादक
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांची कधीच भेट झाली नाही, असे पुरावे आहेत. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी चाकर होते. वीर बाजी पासलकर यांनी शिवरायांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी करून अकलेचे तारे तोडले.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २७ ऑगस्टला पुणे येथील एका कार्यक्रमात ‘राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजी यांना डावपेच शिकवले अन् पुढे ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणून राष्ट्रनायक झाले’, असे विधान केले होते. त्यावर अमोल मिटकरी यांनी वरील टीका केली.
आमदार मिटकरी पुढे म्हणाले.
१. राजनाथ सिंह यांनी अभ्यास करावा. महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसू नये अन्यथा त्यांची अवस्था शूर्पणखाप्रमाणे झाल्याविना रहाणार नाही. जिजामाता आणि शहाजी राजे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार केले अन् त्यानंतर शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले. पुणे महानगरपालिकेनेही हा इतिहास मान्य करून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. (दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणारे लोक कोण होते, हे जनता जाणून आहे ! – संपादक)
२. पुण्याच्या काही लोकांनी राजनाथ सिंह यांना वेगळी माहिती दिल्यामुळे त्यांनी असे बालीश वक्तव्य केले. मी राजनाथ सिंह यांना सांगू इच्छितो की, तुम्ही राफेल विमान खरेदी करायला गेला असतांना विमानाजवळ लिंबू-मीरची ठेवून अकलेचे दिवाळे काढले होते. त्या वेळी पूर्ण जग हसले होते. (एकीकडे विदेशातील अनेक जिज्ञासू आज सनातन धर्माचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करून अनुभती घेत आहेत, तर दुसरीकडे पुरो(अधो)गामी लोक शास्त्रात सांगितलेल्या कृतींमागील अर्थ जाणून न घेता त्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत ! असे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक) त्यामुळे अशांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यास नसेल, तर त्यांनी तो करायला हवा.’’ (सत्य इतिहास मांडणार्यांना खोटे ठरवण्याचा आणि खोटा इतिहास सत्य म्हणून रेटून नेण्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झाला असता, तर महाराजांनी अशा इतिहासद्रोह्यांना कठोर शासनच केले असते ! – संपादक)