कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शासन कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सिद्ध असल्याचेही प्रतिपादन

पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अजूनही कोरोनाबाधित ४५ रुग्णांची स्थिती गंभीर आहे आणि असे रुग्ण प्रत्येक दिवशी भरती होत आहेत. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बेतकी, खांडोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आदींचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित होऊन रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये, यासाठी आजही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची चाचणी केली जात आहे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचाराला प्रारंभ केला जातो. आजही घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा पाठपुरावा आरोग्य खाते सातत्याने घेत आहे. यदाकदाचित् कोरोनाची तिसरी लाट आली, तर ती हाताळण्यास गोवा शासन सिद्ध आहे. यासाठी गोवा शासनाची तज्ञ समिती आणि कृती समिती कृतीशील आहे, तसेच शासनाने पायाभूत सुविधा सिद्ध ठेवल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना हाताळण्यासाठी तज्ञ सिद्ध केले आहेत.’’

२ ऑक्टोबरपासून गोमंतकियांना दूरभाषद्वारे वैद्यकीय सल्ला देण्याची सुविधा उपलब्ध होणार !

गोवा शासन २ ऑक्टोबरपासून गोमंतकियांना दूरभाषद्वारे वैद्यकीय सल्ला देण्याची सुविधा (टेलिमेडिसीन कन्सल्टेशन सेवा) उपलब्ध करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘‘विशेषतः ज्येष्ठ नागरिक घरी बसून दूरभाषवरून आधुनिक वैद्यांकडून वैद्यकीय सल्ला घेऊ शकतील. या वेळी रुग्णांना केवळ रुग्णालयात भरती व्हावे लागणार असल्यासच रुग्णालयात बोलावले जाईल. दूरभाषद्वारे चौकशी करून आवश्यक सल्ला दिला जाणार आहे. यामुळे कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.’’