जनतेने आवाज उठवल्यास सरकार झुकेल आणि जाचक कायदे रहित केले जातील ! – अण्णा हजारे

‘देश बचाव जनआंदोलना’च्या कार्यकर्त्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट !

अण्णा हजारे

नगर, २९ ऑगस्ट – आतापर्यंत आपण आंदोलने करून लोकहिताचे कायदे संमत करून घेतले; मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर संमत करण्यात येत आहेत. मागणी नसतांनाही अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळे सरकारलाही असे करणे शक्य होत आहे. जनतेने आवाज उठवल्यास सरकार झुकेल आणि जाचक कायदे रहित केले जातील, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी ‘देश बचाव जनआंदोलन समिती’शी चर्चा करतांना स्पष्ट केली. समितीने गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी आणि आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा’, अशी मागणी केली होती.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, माझे वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू ? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी यांविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभे करा. मी तुमच्या आंदोलनात अवश्य सहभागी होईन. मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही, तसेच शेतकरीप्रश्नी ५ वर्षांपासून आपण पाठपुरावा करतच आहोत. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनीही आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिला आहे.