आरोग्य विभागातील २१ आरोग्यसेविकांची पदे रहित होऊ नयेत, यासाठी प्रसंगी आंदोलन करू ! – डॉ. अनिषा दळवी, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
दोडामार्ग – आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कार्यरत २१ आरोग्यसेविकांची पदे रहित करण्यात येऊ नयेत. मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात या कर्मचार्यांनी जनतेला चांगली सेवा दिली आहे. प्रसंगी आंदोलन करू; मात्र एकही पद अल्प होऊ देणार नाही, अशी चेतावणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी दिली आहे.
आरोग्य विभागात वर्ष २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राज्यात २५ सहस्र, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५५६ अधिकारी आणि कर्मचारी राज्य, जिल्हा, तालुका अन् गाव या स्तरांवर मागील १५ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. कोरोना महामारीतही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत निष्ठापूर्वक काम करून जनतेस चांगल्या आरोग्यसेवा देण्याचे काम नियमितपणे केले आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त, आरोग्य सेवक आणि संचालक यांनी कर्मचार्यांना दिलेल्या पत्रानुसार या अभियानात मागील १५ वर्षे कार्यरत असलेल्या २१ आरोग्यसेविकांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोनाच्या काळात प्रसुती शस्त्रक्रिया न केल्याचे आणि या पदांकरिता वेतन संमत न झाल्याचे कारण अचानक सांगून पदावरून अल्प करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे कर्मचारी सध्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत असल्याने सरकारने विचार करून ही पदे अल्प न करता अनुभव आणि कौशल्य यांच्या आधारे जिल्ह्यातील रिक्त पदांवर यांचे समायोजन करावे, तसेच वयाची अट शिथिल करून भरती प्रक्रियेत ४० टक्के आरक्षण द्यावे.
मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात उपकेंद्र स्तरावर प्रसुती करणे किती कठीण होते, हे प्रशासनास समजत नाही, हे दुर्दैवी आहे. ही पदे रहित होऊ नयेत, यासाठी आरोग्य सभापती आणि संपूर्ण जिल्हा परिषद आरोग्यसेविका कर्मचार्यांच्या पाठीशी आहे. या गोष्टीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधून कार्यवाही करू, असे आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी सांगितले.