कोकणात उद्योगांचे जाळे निर्माण झाले, तर माझे मंत्रीपद सार्थकी लागेल ! – नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री
सिंधुदुर्ग – यापुढे येथील तरुण नोकरीसाठी मुंबईत जाणार नाहीत. जिल्ह्यातच उद्योजक बनतील. माझ्या खात्याच्या माध्यमातून कोकणात उद्योगांचे जाळे निर्माण झाले, येथे रोजगार देणारे उद्योजक निर्माण झाले, तर मला मोठे समाधान मिळेल. माझे मंत्रीपद सार्थकी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खारेपाटण येथे केले.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. २७ ऑगस्टला रत्नागिरी येथून पुन्हा ही यात्रा चालू झाली. त्यानंतर रात्री विलंबाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथे यात्रेचे आगमन झाले.
२७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात फिरणार आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात, ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले जात आहे. या यात्रेत माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार अधिवक्ता आशिष शेलार, यात्रा संयोजक प्रमोद जठार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
खारेपाटण येथे राणे पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २०० कोटी रुपये खर्च करून उद्योग-व्यवसाय केंद्र उभारण्यात येईल. तरुण, उद्योजक, व्यावसायिक यांना कर्ज देणे, कोकणात उद्योग उभे करणे, रोजगार निर्माण करणे, हे माझे दायित्व आहे. त्यासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. प्रत्येकाने आजच निर्धार करा की, मी उद्योजक, मालक बनणार.’’
या यात्रेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद
जिल्ह्यात सध्या मनाई आदेश लागू असल्याने पोलिसांनी यात्रेच्या कालावधीत कणकवली येथे एकत्र आलेले भाजप कार्यकर्ते आणि याच काळात एकत्र येऊन घोषणाबाजी करणारे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शिवसेनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे, तसेच जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह ४० ते ५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.