बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम !
नगरपालिकेला मुख्याधिकारी नसणे हे गंभीर आहे. मुख्याधिकार्यांची नेमणूक त्वरित होणे अपेक्षित आहे. – संपादक
बारामती – गेल्या दहा दिवसांपासून बारामतीमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील तपासण्यांपेक्षा शहरातील तपासण्यांचे प्रमाण पुष्कळच अल्प आहे. तपासण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या असल्या तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामती नगरपालिकेस मुख्याधिकारी नाही. रस्ते दुरुस्तीसह नगरपालिकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय पूर्णवेळ अधिकारी नसल्याने मागे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीला लवकरात लवकर मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी होत असली तरी खरोखरीच प्रशासकीय कारणांमुळे ही नियुक्ती रखडली आहे की, त्यामागे इतरही काही कारण आहे याची चर्चा शहरात चालू आहे. महापालिकेकडे सक्षम अधिकारी नसल्याने नगरपालिकेच्या वसुलीच्या कामावरही त्याचा परिणाम होत असून निधीअभावी विकासकामेही रखडली आहेत.