मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !
सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?
शुद्ध बुद्धीद्वारेच मनुष्याला अंततः आनंद प्राप्त होतो ! – पू. डॉ. शिवकुमार ओझा
पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २२ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणपद्धत आणि त्याविषयीच्या ध्येयाच्या दृष्टीने आवश्यक असणारे व्यापक दृष्टीकोन’, यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया
(भाग ८)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/505063.html |
१६. बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे
‘बुद्धीने ग्रहण केलेले ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून अन्य मनुष्यांना दिले जाते. आधुनिक शिक्षण संकुचित दृष्टीकोनाच्या आधारावर स्थापित केलेले आहे. व्यापक दृष्टीकोनाच्या अभावामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक शिक्षणात विविध दोषांचा संग्रह कशामुळे झाला आहे ? या प्रश्नाचे यथायोग्य उत्तर आधुनिक मनुष्याकडे नाही. आधुनिक मनुष्य बुद्धीनेच अधिक काम करतो; परंतु त्या बुद्धीची मलीनता दूर करण्यासाठी किंवा ती शुद्ध करण्याकडे लक्ष देत नाही. बुद्धीचा अशुद्धपणा काय आहे ? तिच्या मर्यादा (Limitations) कोणत्या आहेत ? हे प्रश्न आधुनिक मनुष्याच्या बुद्धीला पडत नाहीत किंवा तो अशा प्रकारच्या प्रश्नांची उपेक्षा करतो.
१७. मनुष्याची बुद्धी सर्वप्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यात समर्थ असली, तरी हे सत्य नसणे
मनुष्याच्या शरिरात बुद्धी हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. आधुनिक युगात विविध प्रकारचे भौतिक ज्ञान आणि सुविधा प्राप्त करण्यासाठी अनेक वैज्ञानिक सिद्धांत अन् उपकरणे यांचा शोध बुद्धीद्वारेच लावण्यात आला आहे. मनुष्याच्या अंतर्मनात अशी धारणा निर्माण होते की, मनुष्याची बुद्धी ही सर्वप्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यास समर्थ आहे; परंतु हे सत्य नाही.
१८. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेले बुद्धीचे महत्त्व
बुद्धीचे महत्त्व सांगतांना श्रीमद्भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की, काम (इच्छा) हे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या द्वारे ज्ञानावर आवरण आणून (पांघरुण घालून) मनुष्याला मोहित करत असते (गीता ३/४०). शुद्ध बुद्धीद्वारे मनुष्याला अंततः आनंद प्राप्त होतो (गीता ६/२१). बुद्धीच्या नाशाने म्हणजेच विवेकहीन झाल्यावर मनुष्य स्वतःच नष्ट होतो (गीता २/६३).
१९. बुद्धीच्या मर्यादा जाणा !
मनुष्याची बुद्धी अमर्यादित क्षमतेची नाही. सांसारिक मनुष्याच्या बुद्धीला मर्यादा असतात; कारण विचार करणे, निश्चय करणे किंवा करू न शकणे हे सर्व बुद्धीला शक्य होत नाही. बुद्धीच्या मर्यादा जाणूनच आपण वेद किंवा वैदिक ग्रंथ यांचे महत्त्व समजू शकतो. वेद बुद्धीपलीकडचे ज्ञान प्रकट करतात. ते ज्ञान अद्वितीय आहे.
२०. ज्ञानेंद्रियांची शक्ती मर्यादित असणे
२० अ. मनुष्याच्या तुलनेत काही पशू-पक्ष्यांमधील पंचज्ञानेंद्रिये अधिक तीव्र स्वरूपात कार्यरत असल्याने मनुष्याच्या बौद्धिक शक्तीला अमर्यादित समजणे अयोग्य ! : बुद्धी हीसुद्धा इंद्रियासारखीच मानली जाते. बुद्धीला ज्ञानेंद्रियांचा आधार असतो. पंचज्ञानेंद्रियांची (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा) शक्ती अत्यंत मर्यादित असते. मनुष्याच्या तुलनेत काही पशू-पक्ष्यांमध्ये ही इंद्रिये अधिक तीव्र स्वरूपाची असतात, उदा. काही कुत्र्यांमध्ये वास घेण्याची शक्ती अधिक असते, तर काही पक्ष्यांमध्ये पहाण्याची दृष्टी अधिक क्षमतेची असते. अशा स्थितीत मनुष्याच्या बौद्धिक शक्तीला अमर्यादित समजणे अयोग्य आहे.
२० आ. बालपणी जर (मेंदूची) वाढ मंद झाली, तर बालपणीच बुद्धी मंद रहाते, वृद्धावस्थेत किंवा काही आजारपणातही बुद्धी तरुणपणातील प्रकृतीच्या तुलनेत मंद होऊन जाते.
२१. बुद्धीचे विभाजन
बुद्धी विभाजित झालेली आहे; म्हणजे विभक्त, विभाजित झालेली, परिमित किंवा मर्यादित आहे. याचे तात्पर्य म्हणजे बुद्धी जर एका विषयात कुशाग्र असेल, तर असे आवश्यक नाही की, ती अन्य विषयांतही (किंवा विषयांत ) तेवढीच कुशाग्र असावी. जर ती एका विशिष्ट काळात कुशाग्र असेल, तर ती भविष्यातही नेहमीच कुशाग्र असावी, असेही आवश्यक नाही. काही वेळा मंद बुद्धीचे काही बालकही नंतर कुशाग्र बुद्धीचे होतात.
२२. मेंदूचा लहानसा भाग कार्यान्वित असून मोठा भाग विनावापर पडून असणे आणि भारतीय संस्कृतीने त्या भागाच्या वापराविषयी सांगणे
आधुनिक वैज्ञानिक सांगतात, ‘‘मेंदूचा लहानसा भागच वापरला जातो. बाकी पुष्कळसा मोठा भाग जीवनभर विनावापरच पडून रहातो.’’ भारतीय संस्कृती या मोठ्या भागाचा उपयोग करण्यास सांगते.’
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510329.html |