मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी शंखनाद आंदोलन !

आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन

मुंबई – राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

याविषयी भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आलेले असतांना केवळ मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. राज्य सरकारकडून त्यांना कोणतेही आर्थिक साहाय्यही करण्यात येत नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये मंदिरे उघडण्यात आली आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे, तसेच धार्मिक स्थळे यांसमोर टाळ, घंटा आणि शंख वाजवून मंदिरे उघडण्याचे आवाहन करावे.