गहाळ वस्तू किंवा कागदपत्रे यांची तक्रार करतांना शपथपत्राची मागणी करणार्‍या पोलिसांवर कारवाई करणार ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई – पोलीस ठाण्यात वस्तू, तसेच पारपत्र, ‘चेकबूक’, परवाना प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार करतांना ठाणे अंमलदार नोटरीकडून शपथपत्र (ॲफिडेविट) करून आणण्यास सांगतात. त्याविना प्रमाणपत्र देण्यास नकार देतात. हे अनधिकृत आहे. शपथपत्राची मागणी करणे म्हणजे तक्रारदाराची अडवणूक करणे होय. अशा प्रकारे शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही. त्यामुळे पोलिसांनी शपथपत्रांची मागणी केल्यास त्यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. २६ ऑगस्ट या दिवशी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.