काबुल विमानतळावरील आक्रमणाचा अमेरिकेने घेतला सूड !
अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट खुरासानच्या ठिकाणावर ड्रोनद्वारे आक्रमण : मुख्य सूत्रधारासह अनेक आतंकवादी ठार
भारताने आतापर्यंत कधी असे केले आहे का ? अमेरिकेकडून असे धाडस भारत कधी शिकणार ? – संपादक
काबुल (अफगाणिस्तान) – काबुल विमानतळावर ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ (‘खुरासान’ म्हणजे उत्तर पूर्व इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश) या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १७० हून अधिक जण ठार झाले होते. यात अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश होता. ‘या आक्रमणाचा सूड घेण्यात येईल’, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषित केल्यानंतर अवघ्या काही घंट्यांतच अमेरिकेने अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट खुरासानच्या ठिकाणावर ड्रोनद्वारे (मानवविरहित लहान विमानाद्वारे) आक्रमण करून आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असणार्या आतंकवाद्याला ठार केले. या आक्रमणामध्ये कुठल्याही सामान्य नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री पूर्व नंगरहारमधील एका घरावर हे आक्रमण करण्यात आले. त्यात हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यात मुख्य सूत्रधारासह अनेक आतंकवादी ठार झाल्याचा अमेरिकेने दावा केला आहे.