(म्हणे) ‘पीडित तरुणीने सायंकाळी मित्रासमवेत निर्जन स्थळी जायला नको होते !’ – राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांचा पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न

  • मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर सारवासारव !

  • भाजपच्या राज्यातील गृहमंत्र्यांकडून असे बोलणे हिंदूंना अपेक्षित नाही !

कुठे रामराज्यात मध्यरात्रीही दागिने घालून महिला एकटीच बाहेर पडू शकत होती, तर कुठे आताच्या काळात दिवसाही मित्रासमवेत असतांनाही तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो आणि शासनकर्तेही तरुणीला उत्तरदायी ठरवतात ! ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !

राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील मैैसुरू येथे काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या महाराष्ट्रातील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पोलिसांनी त्या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. या घटनेविषयी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी ‘बलात्कार मैसुरूमध्ये झाला; परंतु काँग्रेसकडून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही एक अमानवीय घटना होती. तरुणी आणि तिचा मित्र निर्जन ठिकाणी गेले होते. अशा ठिकाणी त्यांनी जायला नको होते. तरुणी सायंकाळी ७ वाजता निर्जन स्थळी काय करत होती ?’ असा प्रश्‍न विचारत पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.

१. यावरून ज्ञानेंद्र यांच्यावर विरोधी पक्ष आणि समाजातून टीका होत आहे. त्यातच ज्ञानेंद्र यांनी ‘काँग्रेसकडून माझा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे उत्तर दिले. या वक्तव्यावरून त्यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणीही आता होऊ लागली आहे.

२. याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही ‘मी बलात्काराच्या घटनेसंबंधी आमच्या गृहमंत्र्यांद्वारे करण्यात आलेल्या टिप्पणीवर सहमत नाही. मी त्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत’, असे पत्रकारांशी बोलतांना म्हटले.

३. यावर ज्ञानेंद्र यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘या दुर्दैवी घटनेविषयी कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरोधात केलेले माझे वक्तव्य मी मागे घेत आहे. सरकार आणि पोलीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.’