‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतील स्वयंसूचना ‘गुरुमंत्र’स्वरूप आहे असे साधकाला सुचणे आणि भावजागृती होणे.
‘१२.१२.२०१९ या दिवशी एका सेवेनिमित्त एका संतांशी भेट झाली. त्या वेळी त्या संतांनी ‘तुझी साधना कशी चालू आहे ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘माझी भावजागृती होत नसून मला पुष्कळ कोरडेपणा जाणवत आहे आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यामध्येही पुष्कळ कोरडेपणा आल्याचे मला वाटत आहे.’’ त्यावर ते संत म्हणाले, ‘‘तुझी सेवा संगणकावर असल्यामुळे बुद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे तुझी भावजागृती होत नाही. त्यासाठी तू स्वयंसूचना दे. त्यामुळे तुझ्या मनाला भावजागृतीचे प्रयत्न सतत करण्याची जाणीव राहील आणि काही दिवसांनी तुझी भावजागृती होईल.’’ त्यानुसार स्वयंसूचना बनवली, ‘जेव्हा मी संगणकीय कार्य करत असेन, तेव्हा ते कार्य मी ‘श्री गुरुदेवांची सेवा’ म्हणून करत आहे’, याची जाणीव मला होईल आणि मी ते कार्य भावपूर्ण अन् कृतज्ञतापूर्वक करीन.’ लगेच या स्वयंसूचनेचे अभ्याससत्र मी नियमित चालू केले.
काही दिवसांनी देवाने मला सुचवले, ‘पूर्वीच्या काळी श्री गुरु शिष्याला गुरुमंत्र देत असत. शिष्याने निष्ठापूर्वक गुरुमंत्राचा जप केल्यावर त्याच्या चित्तावरील जन्मोजन्मीचे संस्कार पुसले जात. त्याचप्रमाणे स्वयंसूचनाही ‘गुरुमंत्र’स्वरूपच आहेत आणि त्यांचे अभ्याससत्र नियमित केल्यावर आपल्या चित्तावरील संस्कार लवकर पुसले जातात.’ हे विचार मनात येताच माझी भावजागृती झाली.’ – श्री. नीलेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०१९)