‘गोवा मायनिंग पीपल्स फोरम’ ही संघटना निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी नवीन मंच स्थापन करणार
पणजी, २७ ऑगस्ट (वार्ता.) – ‘गोवा मायनिंग पीपल्स फोरम’ (जी.एम्.पी.एफ्.) ही संघटना निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी नवीन मंच स्थापन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पुती गावकर यांनी दिली आहे. खाण व्यवसायावर अवलंबून असणार्यांचे नेतृत्व करणारी ‘जी.एम्.पी.एफ्.’ ही संघटना गोव्यात बंद असलेल्या खाणी चालू होण्यासाठी कृतीशील आहे. सर्वाेच्च न्यायालयाने वर्ष २०१८ मध्ये राज्यातील ८८ खाणींच्या लिज (काही वर्षांसाठी भूमी वापरण्यास देणे) रहित केल्याने गोव्यात खाणव्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प झालेला आहे. खाणव्यवसाय बंद झाल्याने राज्यातील लाखो लोकांच्या उपजीविकेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम झालेला आहे, तरीही गोव्यातील खाणव्यवसाय अजूनही चालू झालेला नाही. शासनाने ‘गोवा खनिज महामंडळ’ स्थापन केले असून यामुळे पुढील ३ मासांत गोव्यातील खाणव्यवसाय चालू होणार असल्याचा शासनाचा दावा आहे; मात्र शासनाच्या या प्रयत्नांवर ‘जी.एम्.पी.एफ्.’ समाधानी नाही. या पार्श्वभूमीवर ‘जी.एम्.पी.एफ्.’ने वरील निर्णय घेतला आहे.
‘जी.एम्.पी.एफ्.’चे अध्यक्ष पुती गावकर पुढे म्हणाले, ‘‘गेली ३ वर्षे विद्यमान शासनाने जनतेच्या हितासाठी कोणतेच काम केलेले नाही. विद्यमान शासनाला केवळ स्वत:चे आणि पक्षाचे हित सांभाळायचे आहे. खाण अवलंबितांसाठी शासनाने काहीच केलेले नाही. गेल्या ३ वर्षांत गोव्यात एकही नवीन उद्योग आलेला नाही. गोवा शासन ६ मासांत खाणव्यवसाय चालू करू शकते; मात्र शासनाच्या मनात निराळेच काहीतरी आहे.’’