मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची निवड !
मिरज, २७ ऑगस्ट (वार्ता.) – मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या रंगशारदा देवल सभागृह येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, सदस्य यांच्या निवडींसह निमंत्रक म्हणून ओंकार शुक्ल यांची निवड करण्यात आली आहे.
मिरज शहर गणेशोत्सव समितीने केलेल्या मागण्या
१. सर्व गणेशोत्सव मंडळांना श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मागणीनुसार मंडपास अनुमती देण्यात यावी.
२. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी २५ कार्यकर्ते आणि वाद्य वाजवण्यास अनुमती द्यावी.
३. शहरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. (मिरज शहर गणेशोत्सव समितीला अशी मागणी करावी लागणे हे प्रशासानासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
४. दळणवळण बंदी आणि महापूर यांमुळे जनतेला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक वीजजोडणी गणेशोत्सव होईपर्यंत तोडू नये, तसेच सक्तीने वसुली करू नये.
५. या, तसेच अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समवेत बैठक आयोजित करावी.