काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रीमंडळातून विसर्जित करा !

काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काँग्रेसला घरचा आहेर ! – संपादक 

नागपूर – येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि पशुसंवर्धन अन् क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून त्यात ‘केदार यांना मंत्रीमंडळातून विसर्जित करावे’, अशी मागणी केली आहे.

१. ‘वर्ष २००२ मध्ये मंत्री सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतांना त्यांनी बँकेचे १५० कोटी रुपये खासगी दलालांच्या वतीने रोख्यांमध्ये गुंतवून अधिकोषाची १५० कोटी रुपयांची हानी केली’, असा आरोप त्यांच्यावर आहे.

२. या प्रकरणी केदार आणि इतर १० आरोपी यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाने न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. हा खटला गेली १९ वर्षे न्यायालयात चालू आहे.

३. या प्रकरणी सरकारी अधिवक्ता म्हणून आसिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कुरेशी यांची नेमणूक रहित करून त्या ठिकाणी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्यासारख्या सक्षम अधिवक्त्यांची नियुक्ती करावी’, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे केली आहे.