थकबाकी वसुलीसाठी दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्याला जप्तीची सूचना !

अनुमाने १५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत !

दौंड (जिल्हा पुणे) – तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनुमाने १५० कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याने थकबाकी वसुलीसाठी कारखाना जप्तीची सूचना दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. भीमा पाटस साखर कारखान्याच्या गैरकारभाराची माहिती देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष, तसेच माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने साहाय्य करूनही कारखाना चालू होऊ शकला नाही. कारखान्याने सभासदांसह कर्जपुरवठा करणार्‍या बँकांचीही फसवणूक केली आहे. कायदेशीर हमी देत एकाच ट्रॅक्टरवर अनेक बँकांकडून कर्ज घेतले असून हे कर्जसुद्धा थकित असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या गैरकारभारामुळे कामगार, शेतकरी आणि ग्राहक अडचणीत आल्याने कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सहकार आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. (‘साखर कारखाने डबघाईला आले’, ‘साखर कारखान्यांचा गैरकारभार’ अशा प्रकारची वृत्ते सातत्याने ऐकण्यास आणि वाचण्यास मिळतात. साखर कारखान्यांच्या विषयी सरकारने परिणामकारक उपाययोजना आणि धोरण आखून शेतकरी अन् ग्राहक यांचे हित जपणे आवश्यक ! – संपादक)