‘गोकुळाष्टमी’निमित्त संकल्प करूया !
‘समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना उत्तम रहावी’, असे अनेकांना वाटते; मात्र यासाठी कोणते प्रयत्न करायचे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. सध्या हिंदु देवतांचे विडंबन, धर्मांतर, भ्रष्टाचार, गोहत्या, लव्ह जिहाद, मंदिरांतील चोर्या, मूर्तीभंजन अशा विविध माध्यमांतून हिंदु धर्मावरील आघात वाढत आहेत. नुकतेच श्री गणेशाचे चित्र आणि नाव यांचा वापर करून जुगार खेळण्यासाठी ‘रम्मी गणेश प्रो’ हे ‘ॲप’ चालू करण्यात आले. दळणवळण बंदीच्या काळात उत्तरप्रदेश येथे २ मौलवींनी १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले, तर नाशिक येथील महिला शिक्षणाधिकार्याला लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी अटक केली. ही केवळ काही उदाहरणे आहेत; मात्र अशा अनेक बातम्या आपण पहातो.
धर्मावरील आघात रोखण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच धर्म आणि राष्ट्र प्रेमी नागरिक पुष्कळ तळमळीने प्रयत्नही करत आहेत; मात्र धर्माला आलेली ग्लानी पहाता धर्मसंस्थापनेची आराध्यदेवता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्णत: शरण जाण्याविना मार्गच नाही. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर काठ्या लावण्याचे कार्य गोप-गोपींनी केले, त्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. धर्माला आलेली ग्लानी दूर करणारे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. महाभारताच्या वेळी श्रीकृष्णाने केलेल्या आज्ञेनुसार अर्जुनाने धर्माचे रक्षण केले आणि तो श्रीकृष्णाला प्रिय झाला. त्याप्रमाणे देवतांचे विडंबन होत असल्यास ते रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे, स्वतः लाच न घेणे आणि कुणी तसे करत असल्यास ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, स्वतः धर्माचरण करून इतरांना ते करण्यासाठी सांगणे, अशा प्रकारे तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अनेकांना श्रीकृष्णाचे तारक रूप ठाऊक आहे; मात्र धर्मरक्षणासाठी त्याने मारक रूपही घेतले होते. समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना आदर्श करण्यासाठी प्रत्येकाने धर्माचरण करून स्वत:च्या घरापासून प्रारंभ केल्यास परिसर आणि आपले कार्यक्षेत्र येथे ही व्यवस्था निश्चितपणे आदर्श ठरू शकते. ३० ऑगस्ट या दिवशी असणार्या ‘गोकुळाष्टमी’निमित्त श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन अर्जुनाप्रमाणे आपणही स्वक्षमतेनुसार राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्याचा संकल्प करूया.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर