धर्मद्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘ज्योतिषशास्त्र’ विषय शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा !
हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे जळगाव आणि नंदुरबार जिल्हाधिकार्यांकडे मागणी !
ज्योतिष ही भारतीय संस्कृतीतील प्राचीन विद्या सर्वच विद्यापीठात शिकवली जावी ! – संपादक
जळगाव, २७ ऑगस्ट (वार्ता.) – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या अंतर्गत ‘ज्योतिषशास्त्र’ हा विषय चालू करण्यात येणार असल्याचे वृत्त समजले. विद्यापिठाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून ज्योतिष ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन विद्या आहे; पण असे असले, तरी ‘ज्योतिष’ हा विषय विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये’, अशी मागणी काही नास्तिक आणि हिंदु धर्मविरोधी संघटना यांनी ज्योतिषशास्त्राचा कोणताही अभ्यास न करता केली आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने मूठभर धर्मद्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘ज्योतिषशास्त्र’ शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. येथील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नंदुरबार येथील जिल्हाधिकार्यांनाही वरील विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी ते स्वीकारले. या वेळी प्रा.डॉ. सतीश बागुल, सर्वश्री राहुल मराठे, उज्ज्वल राजपूत आणि चंद्रकांत भोई हे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. हिंदु जनजागृती समिती विद्यापिठाच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे. वेळ पडल्यास आम्ही ‘ज्योतिषशास्त्रा’च्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरू. समाजातील बहुसंख्यांक समाजाचा ज्योतिषशास्त्राला पाठिंबा असल्याने ‘ज्योतिषशास्त्र’ हा विषय विद्यापिठात निडरपणे आरंभ करावा.
२. ‘ज्योतिष हे कालज्ञानाचे म्हणजे काळाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव, जन्मजात लाभलेली कला, कौशल्य, बुद्धी, व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र, जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींच्या संदर्भात उत्तमप्रकारे बोध होतो.
३. आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही, अशा अनेक व्यक्तीगत अडचणींच्या संदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते. समाजाला ज्योतिषशास्त्राची आवश्यकता आहे.
४. ज्योतिषशास्त्रात तथ्य असल्यानेच ते सहस्रो वर्षे टिकले आहे. ‘थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणून विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे. आता भारतीय राज्यघटनेनेच ‘ज्योतिष विज्ञान’ असे म्हटलेले आहे.
५. ‘३५ वर्षांच्या संशोधनानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, ज्योतिष हे शास्त्रच आहे’, असे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन्सीएल्) निवृत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ल यांनी सांगितले आहे.
६. राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘ज्योतिष’ हा विषय शिकवण्यास आरंभ केला असून त्याला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.